Saturday, February 14, 2015

The theory of everything स्टिफन हॉकिंग्ज

स्टिफन हॉकींग्ज - दि थेअरी ऑफ एव्हरीथिंग

सन १९६३. ऑक्सफर्ड मध्ये विद्यार्थ्यांची एक पार्टी चालू आहे.
एक तरूण एका तरूणीला गाठतो-
तो म्हणतो – “मी विश्वरचना शास्त्राचा विद्यार्थी आहे.”
“ते काय असतं?”
“बुद्धिमान नास्तिकांसाठी तो धर्म आहे.”

स्टिफन हॉकिंग्ज जगातला सर्वात लोकप्रिय वैज्ञानिक. त्याला आपण दि सिम्पसन मध्ये बघितलं स्टार ट्रेक मध्ये बघितलं पण त्याला आपण कधीच असं बघितलं नाही – तरूण, निरपंग, महत्त्वाकांक्षी, प्रत्यक्ष बोलून संवाद साधणारा विद्यार्थी. वर दिलेला प्रसंग दि थेअरी ऑफ एव्हरीथिंग या चित्रपटातला सुरुवातीचा प्रसंग आहे. स्टिफन हॉकिंग्जच्या वाटाल्या आलेल्या असाधारण जगण्याची ही कहाणी आहे. त्याच्या आणि जेन विल्डीच्या उमललेल्या आणि संपलेल्यासुद्धा प्रेमाची, संसाराची ही कहाणी आहे. जेन विल्डी म्हणजे स्टिफन हॉकिंग्जची प्रथम पत्नी. ती वृत्तीने पारंपारीक, धर्म-कर्म मानणारी तर तो देव नाकारणारा खगोलशास्त्राचा अभ्यासक. या विरोधाभासातूनही त्यांच्या संसाराची, जीवनाची वाटचाल कशी होणार याचे एक कुतुहल पार्श्वभूमीला बाळगत हा चित्रपट सरकतो. असे जीवनात घडू शकते? शक्य नसले तरी त्याने काय फरक पडतो?

एडी रेडमायन आणि फेलिसिटी जोन्स यांनी स्टिफन आणि जेन यांच्या भूमिका अप्रतिम वठवल्या आहेत. विशेषत: स्टिफनला झालेल्या  मोटर न्यूरॉन विकारामुळे त्याच्या हालचालींवर झालेले परिणाम अभिनित करण्यात एडीने आपले अभिनय कौशल्य उत्तम तर्‍हेने व्यक्त केले आहे. विकाराच्या अंमलाखाली जात असणार्‍या स्टिफनच्या शरीराच्या हालचाली आणि मनाची तगमग आणि उभारीही अतिशय प्रभावीपणे एडीने वठवली आहे. विकाराच्या पुढच्या टप्प्यात पूर्णपणे जखडलेला आणि फक्त नजरेनेच काही सांगता येऊ शकते अशी वेळ आलेला स्टिफन वठवणे हे एक कठीण कार्य एडीने पेलून दाखवले आहे.

जोन्सने कणखर आणि खंबीर जेन वठवली ती अतिशय हळुवारपणे. विशेषत: जेनचे स्टिफनच्या जीवनातील स्थान रंगवताना त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हेटाळणीचा, आक्रस्ताळा किंवा नगण्य महत्त्वाचा असणार नाही हे जोन्सच्या कामातून सतत दिसते. एका हयात वैज्ञानिकाच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवताना त्यात त्याचे जगणे आणि त्याचा वैज्ञानिक शोध यांचा आढावा घेणे यांची सांगड घालण्याची एक मोठी कसरत निर्माता – दिग्दर्शकांना करावी लागते. जगण जास्त रंगवलं तर ती एका सामान्य व्यक्तिची कथा होऊ शकते आणि वैज्ञानिक शोधाबद्दल जास्त सांगितलं तर ते एक निरस आणि अनाकलनीय निवेदन ठरू शकतं. स्टिफन हॉकिंग्ज यांच्या संशोधनाबद्दल चित्रपटातून पूर्ण माहिती मिळेल अशी अपेक्षा दोन तासांच्या चित्रपटाकडून ठेवता येणार नाही. त्यासाठी वैज्ञानिक संशोधन ग्रंथ वाचणे हाच मार्ग योग्य ठरेल. त्यासाठी स्टिफन हॉकिंग्ज लिखित ए ब्रिफ हिसट्री ऑफ टाईम – काळाचा संक्षिप्त इतिहास – हे सुबोध पुस्तक जरूर वाचावे.

कृष्णविवरांतून काहीही बाहेर पडू शकत नाही या समजूतीची पहिली चिकित्सा हॉकिंग्सच्या आधी कोणी केली नाही, विशेषत: पुंजसिद्धांताचा वापर करून हॉकिंग्जने असे दाखवून दिले की काही प्रारणे थोड्या प्रमाणात कृष्णविवरातून बाहेर पडू शकतात. त्याला हॉकिंग्ज प्रारण असे म्हणता येऊ शकेल. चित्रपटात हा शोध लागण्याचा क्षण साक्षात्काराचा क्षण असल्यासारखा दाखवला आहे. अपंगू झालेल्या स्टिफनला जेन स्वेटर चढवत असताना तिला मुलाच्या धडपडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो म्हणून ती तो स्वेटर हातांवर तसाच अर्धवट सोडून मुलाला उचलायला जाते. स्टिफन आपल्या शरीरातला जोर लावत स्वेटर डोक्यावर चढवतो पण त्याला ते काम जमत नाही आणि स्वेटर तसाच अर्धवट अडकतो. स्वेटरच्या जाळीमधून घरातल्या शेकोटीच्या ज्वाळा त्याला दिसतात. त्या ज्वाळांच्या हालचालीतून त्याला कृष्णविवरातून बाहेर येणार्‍या प्रारणांचा शोध लागल्याचे दाखवले आहे. वास्तवात या कल्पनेचं सातत्याने मनन चिंतन करत, त्याचे गणिती आकडेमोडीने येणारे सैद्धांतिक उत्तर तपासून मग कालांतराने शोध पूर्ण होत असतो. अर्थात स्टिफनचे मार्गदर्शक प्रोफेसर त्याला गणिती समीकरणांतूनच सिद्धात सिद्ध करण्याचे सातत्याने सांगताना दाखवले आहे. त्यामुळे हा - युरेका युरेका – क्षण दाखवण्याचा चित्रपट कर्त्यांना पडलेला मोह आहे असे मानता येते.

जेम्स मार्श याने हा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. त्याने पूर्वीही विज्ञानावर आधारीत चित्रपट बनवले आहेत. 2011 मध्ये त्याने प्रोजेक्ट नीम नावाचा लघुपट बनवला. यात एका चिम्पांझीच्या पिलाचे संगोपन माणसाच्या पिलासारखे केलेले दाखवले आहे. तीही एक विज्ञान विषयक कथा आहे. मात्र त्यातही विज्ञान चुकीच्या पद्धतीने पुढे आणले आहे.

चित्रपटाचा विषय  सोन्यासारखा मौल्यवान आहे. मात्र दिग्दर्शकाच्या कमजोर मांडणीमुळे स्टिफन हॉकिंग्जच्या कामाची जटीलता त्यातून स्पष्ट होत नाही. चित्रपट काठावर राहातो, स्टिफन हॉकिंग्जच्या कार्य कर्तृत्वाचे थोरपण हृदयापर्यंत पोचवायला तो पुरेसा पडत नाही. त्या मानाने इंटरस्टेलर हा चित्रपट जरा प्रभाव पाडतो. इंटरस्टेलर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता आणि वैज्ञानिक सल्लागार - किप थोर्न आहे. तो वास्तवशास्त्रज्ञ आहे आणि तो बराच काळपर्यंत स्टिफन हॉकिंग्जचा मित्र राहीला होता. इंटरस्टेलर हा त्या अर्थाने मुख्य प्रवाहातला म्हणता येईल असा चित्रपट त्यातून - कृष्णविवर या कल्पनेतील विज्ञान सोपेपणाने समोर आणण्यात त्याला बर्‍यापैकी यश आले आहे.

दि थेअरी ऑफ एव्हरिथिंग या चित्रपटाचा मुख्य आधार म्हणजे – जेन विल्डीने 1995 मध्ये लिहीलेले पुस्तक – ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी: माय लाइफ विथ स्टिफन. त्या आधी जेन आणि स्टिफन यांची वैवाहिक बंधनातून फारकत झालेली होती. चित्रपटाने स्टिफन हॉकिंग्जच्या जीवनगाथेला कितपत न्याय दिला आहे हे जाणून घेण्यासाठी जेनची मुलाखत रोवन हुपर या पत्रकाराने घेतली. ती वाचणेही उदबोधक ठरेल.

स्टिफन म्हणतो की चित्रपट ढोबळमानाने खरा आहे, तुला काय वाटते?
विशेषत: चित्रपटातील मनाला भावणारे किंवा खूप भिडणारे प्रसंग खरोखरच घडलेल्या प्रसंगातले आहेत, मात्र त्यातल्या काल्पनिक प्रसंगाशी किंवा माझ्या अनुभवांमध्ये नसलेल्या घटनांबद्दल मला काही म्हणायचे नाही.

स्टिफनशी झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंग कसा वाटला?
त्या वेळी - विश्वरचनाशास्त्र किंवा धर्म याबद्दल आमची काही चर्चा वगैरे झाली नाही. तसा स्टिफन म्हणाला होता की त्यानं नुकतंच विश्वरचनाशास्त्रावर संशोधन सुरू केलं आहे. त्यामानाने - तोंडी परिक्षेच्या शेवटी ऑक्सफर्डच्या परिक्षकांशी झालेल्या चर्चेबद्दलच तो जास्त बोलत होता.

चित्रपटात एक प्रसंग आहे की - तुम्ही एक सार्वजनिक नृत्याच्या कार्यक्रमात भेटता, तेव्हा तो तुला समजावून सांगतो की, नृत्याच्या वेळी लावलेल्या विशिष्ट निळ्या दिव्यांच्या उजेडामुळे, टाईड धुण्याच्या पावडरने धुतलेले कपडे कसे चमकतात, आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तुझ्या घराच्या दाराबाहेर टाईड पावडरचा पुडा असतो – असं झालं होतं?
असं कोणी करेल असं मला वाटत नाही.

स्टिफनचं म्हणणं जगाला सांगण्यात असणारा तुझा वाटा, चित्रपटात तुला मिळाला नाही असं तुला वाटतं का?
विविध भाषेची अभ्यासक असल्यामुळे मला स्टिफन काय आणि कसं सांगतोय हे समजून घेण्याची उत्सुकता असायची. त्याच्या कामाबद्दल, संशोधनबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल मला अभिमान आहे. त्या वेळी विज्ञानाची फारशी समज नसणार्‍या एखाद्या सामान्य माणसालाही समजेल अशा भाषेत गुरुत्वाकर्षण मोडून पडते म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने कृष्णविवराबद्दल मी सहज सांगत असे. ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे पहिले प्रुफ रिडींग मीच केले आहे. जेव्हा त्याबद्दलच्या आठवणीं लिहीण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या अनेक वैज्ञानिक मित्रांशी सल्लामसलत केली, समजून घेतले आणि मी स्वत:च त्या विषयांबद्दल लिहीले. कित्येक टिकाकार माझ्या लिखाणातल्या या भागातल्या चुका काढण्याची संधी शोधणार याची शक्यता मी लक्षात घेऊम हे केले.

स्टिफनच्या मांडणीमुळे काहींच्या धार्मिक समजूतींना धक्का लागेल किंवा अगदी तुझ्याही ख्रिस्तीधर्मा श्रद्धांवर आघात होईल याचा ताण तुला कितपत अनुभवाला आला?
मला माझ्या ख्रिस्ती श्रद्धा दृढ कराव्या लागल्या आणि त्यांतूनच मी उभारी मिळवली. मी करते ते योग्य आहे यावर विश्वास ठेवून मी जगले, त्याचे माझ्या जगण्याला मोठा आधार मिळाला नाही तर मी दडपणाखाली दबून संपून गेले असते. स्टिफनचा निरिश्वरवादी पवित्रा आणि माझी श्रद्धा दोन्ही बाबी सातत्याने आमच्या संबंधात एकत्र वावरत होत्या त्याचा एक तणावही असायचा पण आमच्यापैकी कोणाही दुसर्‍याला बदलवायचा प्रयत्न केला नाही. मी कट्टर धर्मवादी नाही.

तुमच्यातल्या तणावाने कधी उग्र रूप धारण केलं नाही का? चित्रपटात असा एक प्रसंग आहे – ए ब्रिफ हिसट्री... पुस्तकाच्या लिखाणावेळचा, एका वाक्यावर तुमची बोलाचाली होते तेव्हा स्टिफन म्हणतो – की सर्वसमावेशक असा सिद्धांत सापडला की “मग आपल्याला देवाच्या मनात काय आहे ते सुद्धा समजेल......”
हो, काही प्रसंग भयंकर आले. 1988 साली इस्राएलच्या एका वैज्ञानिकांच्या परिषदेत असा प्रसंग घडला. ते शहर म्हणजे माझ्यासाठी अतिशय पवित्र आणि जगातलं सर्वात जुनं शहर, तिथे हा मोठ्या गर्वाने म्हणाला की – “मी देवाचे अस्तित्व मानत नाही आणि माझ्या जगात देवाला काहीही स्थान नाही.” ते माझ्या मनाला फार लागलं आणि मला त्याचं पुढं काही करू नये, असं वाटून गेलं.

चित्रपटातून पुढे आलेल्या तुझ्या आयुष्याच्या आणि विज्ञानाच्या एकत्रित चित्रणाबद्दल बरीच टीका झाली. त्याबद्दल तू काही केलंस का?
या चित्रपटामुळे तसंच माझी मुलगी लुसी हिच्या पुस्तकामुळे वैज्ञानिकांच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळाली तर चांगलंच आहे. चित्रपटातील वैज्ञानिक तत्थ्ये अचूकतेपणे दाखवणे किती आवश्यक आहे हे मी चित्रपट निर्माता दिग्दर्शकांना आग्रहाने सांगितले.
चित्रपटक्षेत्राचे म्हणणे की 25 वर्षांच्या घडामोडी 2 तासात मांडायच्या असतील तर काही घटना गाळायला लागतात, काही काळाचा संकोच करावा लागतो तर काही व्यक्तिरेखा एकत्रही कराव्या लागतात. मला वाटतं त्यांच्या बाजूने त्यांचंही बरोबरच आहे. शेवटी – दि थेअरी ऑफ एव्हरीथिंग – हे काही विज्ञान विषयाचे वृत्तचित्र नाही. तशी वृत्तचित्रे बरीच आहेतही.

पण तुमच्या संबंधांच्या चित्रणाबद्दल काय?
माझी विज्ञाम चित्रणाबद्दल जी प्रतिक्रिया आहे तीच मला इथेही द्यावीशी वाटते. मुळात चित्रपट म्हंटला की त्याला अनेक मर्यादा लक्षात घेऊन पाव शतकाचा काळ दोन तासात बसवायचा आहे. तरीही लखलखीत यश आणि तग धरून जीवंत राहाण्यासाठी उचललेले कष्ट यांना समान स्थान द्यायला हवे होते असे मला वाटते. अतिशय खस्ता खात केलेले आमचे प्रवास उदाहरणार्थ सर्व कुंटुंबासह कॅलिफोर्नियाला केलेले स्थलांतर यापैकी काही तरी दाखवायला हवे होते.
अर्थात तरीही तुम्ही हयात असताना तुमच्या जीवनावर एखादा चित्रपट काढला जाणे ही एक महान बाबच आहे. त्यातून आणखी कोणाला या प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर वाचायला – ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी – हे पुस्तक आहे, यातही मी समाधान मानते.

  

No comments:

Post a Comment