Wednesday, July 15, 2015

जेव्हा इंधन शिल्लक नसेल ---

जेव्हा इंधन शिल्लक नसेल ---

इसवी सन २०२७ची सकाळ!

पाऊस पडतोय. आज पुन्हा तुम्हाला ऑफिसात चालतच जायला लागणारे. लोकल खचाखच गर्दीने भरलेल्या. बस म्हणजे लटकत जायचं. ओल्या रस्त्यांवर दुचाक्या घसरणार. एक बरंय की तुम्हाला फार लांब जायचं नाहीये. तुमच्याकडे छत्री आहेच आता ती खोला आणि निघा.

तुम्ही नशिबवान आहात, तुम्हाला अगदी घराजवळची एक बहुमजली इमारत पाडण्याचं काम मिळालंय. वीजेअभावी मोठमोठ्या इमारतींमध्ये राहाणं नरकात राहाण्यासारखं झालंय. लोक साध्या, छोट्या छोट्या, एक मजली खुल्या हवेशीर इमारतीत राहायला लागलेत. आता या मोठमोठ्या इमारती पाडण्याचं काम झपाट्यात चालू आहे कारण पृथ्वीच्या पोटातली सगळी खनिजं उपसली गेली आहेत आणि गरज पडली की त्यांच्यात पडून राहिलेलं पोलाद काढून घेतलं जातंय. आपल्या या महालांना आपणच तोडायचं आणि गरज पडेल तसा माल काढून घ्यायचा. पेट्रोल आणि वीज यांच्याप्रमाणे कोळसादेखील संपलाय. अणुइंधनाचा वापर घातक शाबित झालाय. सौरऊर्जा अव्यावहारीक होतीच.

दहा वर्षांवरचे पोरंपोरीं अजून मोटारी विसरलेले नाहीत. जेव्हा पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या ते दिवस म्हातार्‍यांना आजही आठवतात. रस्त्यांवर धावणार्‍या मोटारींची संख्या झपाट्याने रोडावत होती. पेट्रोल खरेदी सामान्यांच्या आवाक्यातली बाब राहिली नव्हती. काही मोजके श्रीमंत लोक आपल्या मोटारी फिरवू शकत होते. मोटार ही वस्तू निर्लज्ज श्रीमंतीचे निदर्शक बनली होती. त्यामुळे बाकी सगळे माणसे या मोटारी बघून त्रस्त होत होते. सडकेवरून धावणार्‍या एखाद दुसर्‍या गाडीला लोक अडवत, पालथी पाडून आगही लावत कधी कधी. मग पेट्रोलवर रेशनिंग आलं. रस्त्यावरच्या मोटारी आणखीच कमी झाल्या. दर तीन महिन्यांनी रेशनवरच्या पेट्रोलचं प्रमाण कमी कमी होऊ लागलं.

मग एक दिवस असाही उजाडला ज्या दिवशी रेशनिंगही बंद झालं. मोटारी होत्या तिथेच पडल्या.

मात्र अशा निराशेच्या काळातही आशेचा किरण दिसतोय. अर्थात तुम्हाला त्याचा प्रकाश पहाणं आवडायला हवं. २०२७ सालची ही वृत्तपत्रं तर उघडून पहा. त्यांनी छापलंय की आपल्या शहरांची हवा आता खूप स्वच्छ झाली आहे. हवेत आता कारखान्यांच्या धुरांड्यांतून निघणारा धूर नाही की मोटारींचा धूर नाही.

पोलिसांच्या गस्त घालणार्‍या गाड्या बंद झाल्या की शहरातले गुन्हे वाढतील अशी धास्ती वाटे. पण आश्चर्यकारकरित्या  गुन्ह्यांची संख्या घटली आहे. आता पोलिस पायीपायीच गस्त घालतात. रस्ते आता पूर्वीसारखे रिकामे राहिले नाहीत. पायी चालणारी माणसं शहरभर दिसायला लागली आहेत. आपापल्या मोटारीत बसून एकट्याने फिरण्याऐवजी लोक एकमेकांसोबत पायी फिरतात. ओळखीच्या लोकांच्या गर्दीत सगळ्यांना एकमेकांचे संरक्षण मिळतंय. रस्त्यावर गुन्हे होण्याची शक्यताच आता उरली नाही.

मोसम? जर गारठा असेल तर लोक बाहेर उन्हात बसतात. आणि गरम होत असलं तर लोक सावलीत बसतात. मोकळी हवा हाच आता वातावरण वातानुकूल करण्याचा एकमेव मार्ग राहिला आहे. घराघरातून वीज देता येत नाही कारण ती अगदीच कमी निर्माण होते. रस्त्यांवरचे दिवे विजेने उजळतात हेच सुदैव.

शहराच्या मध्यवर्ती भागात राहाणारे उपनगरात राहणार्‍यांपेक्षा आपलं जगणं सुखाचं आहे असं मानून स्वत:चीच समजूत घालतात. मोटारी होत्या म्हणून ही मोठी मोठी उपनगरं उभी राहीली, मोटारींमुळेच त्याची भव्यता टिकून होती आणि आज त्याच मोटारींच्यामुळे ही महानगरे आपल्या शेवटच्या घटका मोजताहेत. आज या उपनगरवासीयांना अनेक संकटांना तोंड द्यायला लागतंय. रूंद सडकांच्या कडेकडेनी बांधलेल्या बंगल्यात राहाणार्‍या या लोकांना खाण्यापिण्याच्या गोष्टी हातगाड्यांवरून आणायला लागताहेत. थंडगार झोंबरं वारं सुटून बर्फ पडायला लागतो तेव्हा फारच खस्ता खायला लागतात. वीज संपली तेव्हापासून फ्रिज म्हणजे पत्र्याचं एक कपाट मात्र झाला. त्यामुळे खाद्यपदार्थांचा साठा करणं अशक्य झालंय. हा, तसं म्हटलं तर घराबाहेर साठलेल्या बर्फात खाद्यपदार्थ गाडून ठेवता येतील पण मग गल्लीतल्या कुत्र्यांकडे सारखं लक्ष ठेवायला लागतं.

जे काही ऊर्जा स्रोत उरलेत ते वैयक्तिक सुखसोयींवर उडवता येऊ शकत नाहीत. दुसरे ऊर्जा स्रोत सापडत नाहीत तोवर देश चालवण्यासाठी लागेल ती किंमत मोजणं भागच आहे. या करताच उरली सुरली ऊर्जा शेतीच्या कामांसाठी वापरली जातेय. मोटर कंपन्या आता फक्त शेतीची औजारेच बनवतात. कडाक्याची थंडी पडली तर एकाच अंथरूणात एकमेकांच्या पांघरुणात झोपायला लागतं, उकडायला लागलं तर हातपंख्याचा वारा घ्यावा लागतो. मोटारी नाहीत मात्र काही टांगे तेवढे आहेत. पण अन्न पिकलं नाही तर काय करणार? आपली लोकसंख्या फारशी वाढत नाही हे खरं असलं तरी धान्याचा पुरवठा सगळीकडे नियमितपणे करणं दिवसें दिवस अवघड होत चाललंय. शिवाय काही धान्य निर्यात करावंच लागतं तेव्हा कुठे ते देश चार थेंब पेट्रोल आपल्याला देतात.

जगातले अन्य अनेक देश आपल्याइतके भाग्यवान नाहीत हे दिसतंच्चे. इतरांच्या हालाखीच्या वाईट बातम्या ऐकायला मिळाल्यामुळे आपणा अमेरिकन लोकांना दिलासा मिळतो, असे काही वेडपट लोक म्हणतातच की. जगाची लोकसंख्या सतत वाढत चाललीय, म्हणून तिथली माणसं भुकेनं मरताएत. जवळ जवळ साडेपाच अब्ज लोक आहेत जगात. आणि अमेरिका आणि युरोपच्या बाहेर वसणार्‍या दर पाच माणसांपैकी एका व्यक्तिकडेही दोन वेळची भूक भागवण्याइतकं अन्न नाहीये.

पण आताचे आकडे सांगतात की लोकसंख्या भराभर कमी होणारे. यांचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारे बालमृत्यू. भूकबळींमध्ये यांचाच नंबर आधी लागतो. सध्या अमेरिकेतील काही वृत्तपत्रांतून ही बाब चांगली असल्याचं मांडलं जातंय. का? कारण त्यामुळे लोकसंख्या कमी होते ना! हो, अशा बिकट परिस्थितीतसुद्धा काही वर्तमानपत्रं अशा विकृत बातम्या भरलेली आठ पानं बरोबर छापतात.

एक अशीही बातमी आहे की भुकबळी पडणार्‍या भागांमध्ये जेमतेम दोन घास खायला मिळणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या नव्या कुपोषणातून एक नवी समस्या निर्माण झालीय. अशा लोकांचं शरीर कसंबसं चाललंय पण त्यांचं डोकं चालणं बंद होत चाललंय. अशा कमजोर किंवा विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या इथं काही जणांची अशी कुजबूज चाललीय की असल्या लोकांना गुपचूप मारून टाकलं पाहिजे. त्याच्या मते ते एक ‘व्यावहारिक पाऊल’ असेल. अशा आणिबाणीच्या क्षणी पृथ्वीवरच्या या अनावश्यक बोजापासून सुटका करून घेतली पाहिजे. असं ‘व्यावहारिक पाऊल’ काही ठिकाणी टाकलं गेलंय पण त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात काही छापून आलेलं नाही. पण जगाच्या अशा भागातून आलेले प्रवासी असे भयंकर किस्से हलक्या आवाजात सांगतात.

या ऊर्जा संकटानं आणखी एक काम केलंय – प्रत्येक राष्ट्रातलं सैन्य कुठं गायब झालंय कुणास ठाऊक. मोठ्या प्रमाणात पेट्रोल लागणारं सैन्य राखणं आज कोणाला परवडणारे? खांद्यावर बंदूक ठेवलेले थोडे फार गणवेषधारी सैनिक कुठे कुठे आहेत अजूनही, पण आता ते पाय घासत चालतात. घुर्रकन् उडणारी वायुसेनेची विमानं, दणदणत जाणारे रणगाडे, ट्रक, जीपा धूळ खात पडून आहेत.

उरले सुरले ऊर्जास्रोत सतत आटत चाललेत त्यामुळं यंत्रांची जागा हातांना घ्यावी लागतेय. यंत्रं मोडीत काढल्यामुळं कामाचे तास वाढवण्यात आलेत आणि निष्कारण दिले जाणारे आरामाचे तास कमी करण्यात आलेत. आता तसा आराम मिळूनही काही उपयोग नाही, कारण वीजटंचाईमुळे आराम आणि मनोरंजनाची निरर्थक साधनंही मोडून पडलीत. चोवीस तास जाहिराती आणि कार्यक्रमांचे रतीब घालणारा टिव्ही आता रात्री केवळ तीन तीस चालवला जातो. एका आठवड्यात सिनेमागृहातून फक्त तीन खेळ दाखवायला परवानगी आहे. नवी पुस्तकं छापणं जवळ जवळ बंदच झालंय. २०२७ मध्ये केवळ तीनच गोष्टी राहिल्याएत – काम करा, झोपा आणि खा. आणि शेवटच्या गोष्टीची काही खात्री नाही बर का.

या परिस्थितीचं पुढं काय होणार? ते पुढं नाही मागं असेल. एका अंदाजानुसार हा आपल्याला सन १८००च्या काळात घेऊन जाईल. शहरात एकत्र आलेल्या लोकसंख्येला परत गावांकडं परतावं लागेल, छोटे छोटे स्वावलंबी उद्योग करावे लागतील आणि छोट्या शेतांवर विसंबावं लागेल. गाजावाजा न करता हस्तोद्योग आणि ग्रामोद्योग पुन्हा व्यवहारात येत आहेत.

आपण आज या परिस्थितीत काही बदल घडवून आणू शकतो का? मुळीच नाही, यातून बाहेर काढेल असा कोणताही मार्ग शिल्लक नाही. हा, जर आजपासून ५० वर्षांमागे म्हणजे १९७८ साली असे काही निर्णय घेतले असते तर आजची २०२७ची दुर्दशा झाली नसती. आणि कदाचित १९५८ सालीच योग्य दिशेने वाटचाल केली असती तर खूपच सोपं झालं असतं.

-    आयझेक असिमॉव यांच्या ‘टाईम’ या अमेरिकी साप्ताहिकात १९७८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा सारांश.

त्यात लेखकाने म्हंटले आहे की “या लेखात वर्णन केलेली परिस्थिती वास्तवात येईल का सांगता येत नाही, पण आज सारखी उधळ माधळ चालू राहिली तर ही हालत यायला फार काळ लागणार नाही.”                                                                                                                                                

Saturday, February 14, 2015

The theory of everything स्टिफन हॉकिंग्ज

स्टिफन हॉकींग्ज - दि थेअरी ऑफ एव्हरीथिंग

सन १९६३. ऑक्सफर्ड मध्ये विद्यार्थ्यांची एक पार्टी चालू आहे.
एक तरूण एका तरूणीला गाठतो-
तो म्हणतो – “मी विश्वरचना शास्त्राचा विद्यार्थी आहे.”
“ते काय असतं?”
“बुद्धिमान नास्तिकांसाठी तो धर्म आहे.”

स्टिफन हॉकिंग्ज जगातला सर्वात लोकप्रिय वैज्ञानिक. त्याला आपण दि सिम्पसन मध्ये बघितलं स्टार ट्रेक मध्ये बघितलं पण त्याला आपण कधीच असं बघितलं नाही – तरूण, निरपंग, महत्त्वाकांक्षी, प्रत्यक्ष बोलून संवाद साधणारा विद्यार्थी. वर दिलेला प्रसंग दि थेअरी ऑफ एव्हरीथिंग या चित्रपटातला सुरुवातीचा प्रसंग आहे. स्टिफन हॉकिंग्जच्या वाटाल्या आलेल्या असाधारण जगण्याची ही कहाणी आहे. त्याच्या आणि जेन विल्डीच्या उमललेल्या आणि संपलेल्यासुद्धा प्रेमाची, संसाराची ही कहाणी आहे. जेन विल्डी म्हणजे स्टिफन हॉकिंग्जची प्रथम पत्नी. ती वृत्तीने पारंपारीक, धर्म-कर्म मानणारी तर तो देव नाकारणारा खगोलशास्त्राचा अभ्यासक. या विरोधाभासातूनही त्यांच्या संसाराची, जीवनाची वाटचाल कशी होणार याचे एक कुतुहल पार्श्वभूमीला बाळगत हा चित्रपट सरकतो. असे जीवनात घडू शकते? शक्य नसले तरी त्याने काय फरक पडतो?

एडी रेडमायन आणि फेलिसिटी जोन्स यांनी स्टिफन आणि जेन यांच्या भूमिका अप्रतिम वठवल्या आहेत. विशेषत: स्टिफनला झालेल्या  मोटर न्यूरॉन विकारामुळे त्याच्या हालचालींवर झालेले परिणाम अभिनित करण्यात एडीने आपले अभिनय कौशल्य उत्तम तर्‍हेने व्यक्त केले आहे. विकाराच्या अंमलाखाली जात असणार्‍या स्टिफनच्या शरीराच्या हालचाली आणि मनाची तगमग आणि उभारीही अतिशय प्रभावीपणे एडीने वठवली आहे. विकाराच्या पुढच्या टप्प्यात पूर्णपणे जखडलेला आणि फक्त नजरेनेच काही सांगता येऊ शकते अशी वेळ आलेला स्टिफन वठवणे हे एक कठीण कार्य एडीने पेलून दाखवले आहे.

जोन्सने कणखर आणि खंबीर जेन वठवली ती अतिशय हळुवारपणे. विशेषत: जेनचे स्टिफनच्या जीवनातील स्थान रंगवताना त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हेटाळणीचा, आक्रस्ताळा किंवा नगण्य महत्त्वाचा असणार नाही हे जोन्सच्या कामातून सतत दिसते. एका हयात वैज्ञानिकाच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवताना त्यात त्याचे जगणे आणि त्याचा वैज्ञानिक शोध यांचा आढावा घेणे यांची सांगड घालण्याची एक मोठी कसरत निर्माता – दिग्दर्शकांना करावी लागते. जगण जास्त रंगवलं तर ती एका सामान्य व्यक्तिची कथा होऊ शकते आणि वैज्ञानिक शोधाबद्दल जास्त सांगितलं तर ते एक निरस आणि अनाकलनीय निवेदन ठरू शकतं. स्टिफन हॉकिंग्ज यांच्या संशोधनाबद्दल चित्रपटातून पूर्ण माहिती मिळेल अशी अपेक्षा दोन तासांच्या चित्रपटाकडून ठेवता येणार नाही. त्यासाठी वैज्ञानिक संशोधन ग्रंथ वाचणे हाच मार्ग योग्य ठरेल. त्यासाठी स्टिफन हॉकिंग्ज लिखित ए ब्रिफ हिसट्री ऑफ टाईम – काळाचा संक्षिप्त इतिहास – हे सुबोध पुस्तक जरूर वाचावे.

कृष्णविवरांतून काहीही बाहेर पडू शकत नाही या समजूतीची पहिली चिकित्सा हॉकिंग्सच्या आधी कोणी केली नाही, विशेषत: पुंजसिद्धांताचा वापर करून हॉकिंग्जने असे दाखवून दिले की काही प्रारणे थोड्या प्रमाणात कृष्णविवरातून बाहेर पडू शकतात. त्याला हॉकिंग्ज प्रारण असे म्हणता येऊ शकेल. चित्रपटात हा शोध लागण्याचा क्षण साक्षात्काराचा क्षण असल्यासारखा दाखवला आहे. अपंगू झालेल्या स्टिफनला जेन स्वेटर चढवत असताना तिला मुलाच्या धडपडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो म्हणून ती तो स्वेटर हातांवर तसाच अर्धवट सोडून मुलाला उचलायला जाते. स्टिफन आपल्या शरीरातला जोर लावत स्वेटर डोक्यावर चढवतो पण त्याला ते काम जमत नाही आणि स्वेटर तसाच अर्धवट अडकतो. स्वेटरच्या जाळीमधून घरातल्या शेकोटीच्या ज्वाळा त्याला दिसतात. त्या ज्वाळांच्या हालचालीतून त्याला कृष्णविवरातून बाहेर येणार्‍या प्रारणांचा शोध लागल्याचे दाखवले आहे. वास्तवात या कल्पनेचं सातत्याने मनन चिंतन करत, त्याचे गणिती आकडेमोडीने येणारे सैद्धांतिक उत्तर तपासून मग कालांतराने शोध पूर्ण होत असतो. अर्थात स्टिफनचे मार्गदर्शक प्रोफेसर त्याला गणिती समीकरणांतूनच सिद्धात सिद्ध करण्याचे सातत्याने सांगताना दाखवले आहे. त्यामुळे हा - युरेका युरेका – क्षण दाखवण्याचा चित्रपट कर्त्यांना पडलेला मोह आहे असे मानता येते.

जेम्स मार्श याने हा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. त्याने पूर्वीही विज्ञानावर आधारीत चित्रपट बनवले आहेत. 2011 मध्ये त्याने प्रोजेक्ट नीम नावाचा लघुपट बनवला. यात एका चिम्पांझीच्या पिलाचे संगोपन माणसाच्या पिलासारखे केलेले दाखवले आहे. तीही एक विज्ञान विषयक कथा आहे. मात्र त्यातही विज्ञान चुकीच्या पद्धतीने पुढे आणले आहे.

चित्रपटाचा विषय  सोन्यासारखा मौल्यवान आहे. मात्र दिग्दर्शकाच्या कमजोर मांडणीमुळे स्टिफन हॉकिंग्जच्या कामाची जटीलता त्यातून स्पष्ट होत नाही. चित्रपट काठावर राहातो, स्टिफन हॉकिंग्जच्या कार्य कर्तृत्वाचे थोरपण हृदयापर्यंत पोचवायला तो पुरेसा पडत नाही. त्या मानाने इंटरस्टेलर हा चित्रपट जरा प्रभाव पाडतो. इंटरस्टेलर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता आणि वैज्ञानिक सल्लागार - किप थोर्न आहे. तो वास्तवशास्त्रज्ञ आहे आणि तो बराच काळपर्यंत स्टिफन हॉकिंग्जचा मित्र राहीला होता. इंटरस्टेलर हा त्या अर्थाने मुख्य प्रवाहातला म्हणता येईल असा चित्रपट त्यातून - कृष्णविवर या कल्पनेतील विज्ञान सोपेपणाने समोर आणण्यात त्याला बर्‍यापैकी यश आले आहे.

दि थेअरी ऑफ एव्हरिथिंग या चित्रपटाचा मुख्य आधार म्हणजे – जेन विल्डीने 1995 मध्ये लिहीलेले पुस्तक – ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी: माय लाइफ विथ स्टिफन. त्या आधी जेन आणि स्टिफन यांची वैवाहिक बंधनातून फारकत झालेली होती. चित्रपटाने स्टिफन हॉकिंग्जच्या जीवनगाथेला कितपत न्याय दिला आहे हे जाणून घेण्यासाठी जेनची मुलाखत रोवन हुपर या पत्रकाराने घेतली. ती वाचणेही उदबोधक ठरेल.

स्टिफन म्हणतो की चित्रपट ढोबळमानाने खरा आहे, तुला काय वाटते?
विशेषत: चित्रपटातील मनाला भावणारे किंवा खूप भिडणारे प्रसंग खरोखरच घडलेल्या प्रसंगातले आहेत, मात्र त्यातल्या काल्पनिक प्रसंगाशी किंवा माझ्या अनुभवांमध्ये नसलेल्या घटनांबद्दल मला काही म्हणायचे नाही.

स्टिफनशी झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंग कसा वाटला?
त्या वेळी - विश्वरचनाशास्त्र किंवा धर्म याबद्दल आमची काही चर्चा वगैरे झाली नाही. तसा स्टिफन म्हणाला होता की त्यानं नुकतंच विश्वरचनाशास्त्रावर संशोधन सुरू केलं आहे. त्यामानाने - तोंडी परिक्षेच्या शेवटी ऑक्सफर्डच्या परिक्षकांशी झालेल्या चर्चेबद्दलच तो जास्त बोलत होता.

चित्रपटात एक प्रसंग आहे की - तुम्ही एक सार्वजनिक नृत्याच्या कार्यक्रमात भेटता, तेव्हा तो तुला समजावून सांगतो की, नृत्याच्या वेळी लावलेल्या विशिष्ट निळ्या दिव्यांच्या उजेडामुळे, टाईड धुण्याच्या पावडरने धुतलेले कपडे कसे चमकतात, आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तुझ्या घराच्या दाराबाहेर टाईड पावडरचा पुडा असतो – असं झालं होतं?
असं कोणी करेल असं मला वाटत नाही.

स्टिफनचं म्हणणं जगाला सांगण्यात असणारा तुझा वाटा, चित्रपटात तुला मिळाला नाही असं तुला वाटतं का?
विविध भाषेची अभ्यासक असल्यामुळे मला स्टिफन काय आणि कसं सांगतोय हे समजून घेण्याची उत्सुकता असायची. त्याच्या कामाबद्दल, संशोधनबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल मला अभिमान आहे. त्या वेळी विज्ञानाची फारशी समज नसणार्‍या एखाद्या सामान्य माणसालाही समजेल अशा भाषेत गुरुत्वाकर्षण मोडून पडते म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने कृष्णविवराबद्दल मी सहज सांगत असे. ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे पहिले प्रुफ रिडींग मीच केले आहे. जेव्हा त्याबद्दलच्या आठवणीं लिहीण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या अनेक वैज्ञानिक मित्रांशी सल्लामसलत केली, समजून घेतले आणि मी स्वत:च त्या विषयांबद्दल लिहीले. कित्येक टिकाकार माझ्या लिखाणातल्या या भागातल्या चुका काढण्याची संधी शोधणार याची शक्यता मी लक्षात घेऊम हे केले.

स्टिफनच्या मांडणीमुळे काहींच्या धार्मिक समजूतींना धक्का लागेल किंवा अगदी तुझ्याही ख्रिस्तीधर्मा श्रद्धांवर आघात होईल याचा ताण तुला कितपत अनुभवाला आला?
मला माझ्या ख्रिस्ती श्रद्धा दृढ कराव्या लागल्या आणि त्यांतूनच मी उभारी मिळवली. मी करते ते योग्य आहे यावर विश्वास ठेवून मी जगले, त्याचे माझ्या जगण्याला मोठा आधार मिळाला नाही तर मी दडपणाखाली दबून संपून गेले असते. स्टिफनचा निरिश्वरवादी पवित्रा आणि माझी श्रद्धा दोन्ही बाबी सातत्याने आमच्या संबंधात एकत्र वावरत होत्या त्याचा एक तणावही असायचा पण आमच्यापैकी कोणाही दुसर्‍याला बदलवायचा प्रयत्न केला नाही. मी कट्टर धर्मवादी नाही.

तुमच्यातल्या तणावाने कधी उग्र रूप धारण केलं नाही का? चित्रपटात असा एक प्रसंग आहे – ए ब्रिफ हिसट्री... पुस्तकाच्या लिखाणावेळचा, एका वाक्यावर तुमची बोलाचाली होते तेव्हा स्टिफन म्हणतो – की सर्वसमावेशक असा सिद्धांत सापडला की “मग आपल्याला देवाच्या मनात काय आहे ते सुद्धा समजेल......”
हो, काही प्रसंग भयंकर आले. 1988 साली इस्राएलच्या एका वैज्ञानिकांच्या परिषदेत असा प्रसंग घडला. ते शहर म्हणजे माझ्यासाठी अतिशय पवित्र आणि जगातलं सर्वात जुनं शहर, तिथे हा मोठ्या गर्वाने म्हणाला की – “मी देवाचे अस्तित्व मानत नाही आणि माझ्या जगात देवाला काहीही स्थान नाही.” ते माझ्या मनाला फार लागलं आणि मला त्याचं पुढं काही करू नये, असं वाटून गेलं.

चित्रपटातून पुढे आलेल्या तुझ्या आयुष्याच्या आणि विज्ञानाच्या एकत्रित चित्रणाबद्दल बरीच टीका झाली. त्याबद्दल तू काही केलंस का?
या चित्रपटामुळे तसंच माझी मुलगी लुसी हिच्या पुस्तकामुळे वैज्ञानिकांच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळाली तर चांगलंच आहे. चित्रपटातील वैज्ञानिक तत्थ्ये अचूकतेपणे दाखवणे किती आवश्यक आहे हे मी चित्रपट निर्माता दिग्दर्शकांना आग्रहाने सांगितले.
चित्रपटक्षेत्राचे म्हणणे की 25 वर्षांच्या घडामोडी 2 तासात मांडायच्या असतील तर काही घटना गाळायला लागतात, काही काळाचा संकोच करावा लागतो तर काही व्यक्तिरेखा एकत्रही कराव्या लागतात. मला वाटतं त्यांच्या बाजूने त्यांचंही बरोबरच आहे. शेवटी – दि थेअरी ऑफ एव्हरीथिंग – हे काही विज्ञान विषयाचे वृत्तचित्र नाही. तशी वृत्तचित्रे बरीच आहेतही.

पण तुमच्या संबंधांच्या चित्रणाबद्दल काय?
माझी विज्ञाम चित्रणाबद्दल जी प्रतिक्रिया आहे तीच मला इथेही द्यावीशी वाटते. मुळात चित्रपट म्हंटला की त्याला अनेक मर्यादा लक्षात घेऊन पाव शतकाचा काळ दोन तासात बसवायचा आहे. तरीही लखलखीत यश आणि तग धरून जीवंत राहाण्यासाठी उचललेले कष्ट यांना समान स्थान द्यायला हवे होते असे मला वाटते. अतिशय खस्ता खात केलेले आमचे प्रवास उदाहरणार्थ सर्व कुंटुंबासह कॅलिफोर्नियाला केलेले स्थलांतर यापैकी काही तरी दाखवायला हवे होते.
अर्थात तरीही तुम्ही हयात असताना तुमच्या जीवनावर एखादा चित्रपट काढला जाणे ही एक महान बाबच आहे. त्यातून आणखी कोणाला या प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर वाचायला – ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी – हे पुस्तक आहे, यातही मी समाधान मानते.

  

Sunday, January 18, 2015

तिची दिशाच वेगळी

-    डॉ सुनीता बागवडे



खिडकीबाहेर लांबवर पसरलेली झाडी, खास वाढवलेली फुलझाडी. अतिशय छान दृश्य होते. त्याच्यातच विरळ विरळ असलेल्या विशेष प्रकरच्या रचनांची घरे, छोट्या वसाहतीच जणू. अतिशय सुबक शान्ख्वाकृतू उभट रचना. आत्ता सगळ्यात वरच्या मजल्यावरून बाहेर पहिले मी. प्रथमा असल्याने वेळ नव्हता बघत बसायला आणि पद्धतही नव्हती.. सृष्टी सौंदर्य त्याचा आनंद .. असं काही होते म्हणे.. आत्ता ३०५० साली व्यवस्थेचे महत्व सगळ्यात जास्त होते आणि मी व्यवस्थापिका होते. ही कालमापन पद्धती प्रबळ होती पूर्वी. ते घड्याळ, त्यावर बांधलेले दिवस.. माणसांसाठी घड्याळे कि घड्याळांसाठी माणूस तेच कळेना? तो अन घड्याळ दोन्ही पळायचे. नंतर एक काळ निसर्गाने त्या पायांना असे करकरचून बांधले कि धावणे काय रांगणेही जमेना. रांगणारे पायच जन्माला येणे बंद झाले.

आधी नैसर्गिक आपत्तीत मृत्यू व्हायचे. माणसाने निवारे बांधले. रोगराई, जंतूमुळे माणसे मारायची. औषधे आली. निसर्गाला शक्य तेवढे ओरबाडून सुख स्वास्थ्य वाढवले. आयुष्यमान वाढले. मृत्यूवर मात करण्याच्या वल्गना सुरु झाल्या. निसर्गाला कसे परवडणार? कुठल्याही एका प्राण्याला जास्त वाढू देणे संतुलन बिघडवणार. मग त्याने जन्मच आडवला.. २१ व्या शतकात याची सुरुवात झाली. स्त्रीबीज तयार होईनात, शुक्राणू कमी झाले. फलन होईना. मग गर्भाशयात मृत्यू पेशी तयार झाल्या गर्भपात करणाऱ्या .. मग काय परीक्षा नळीतले गर्भ, क्लोन्स सगळे व्यर्थ.. गर्भाशय गर्भ धारणच करेनात. स्त्री जन्म जणू व्यर्थ .. भंपक पणा नुसता. मग आम्ही तर जन्मुच नये.

सगळे उपाय खुंटले. २२ व्या शतकात लोकसंख्या निम्मी झाली. हाहाकार माजला. सगळी कथित प्रगती अक्षरशः शून्य झाली. त्या सगळ्या सुखसोयी भोगणार कोण? सगळे वृद्ध मरू घातलेले लोक उरले. २३वे शतक उजाडत होते. मानवजात संपण्याचा धोका उभा राहिला. हवालदिल झाले लोक.. माझ्यात तेवढी संवेदन शिल्लक आहे . त्यांच्या भावना समजू शकते मी.. बाकींच्यासाठी डोके, भावना वापरणे व्यवस्थेत बसत नाही. म्हणजे गरजच भासत नाही. निसर्गावर मात करण्यासाठीच माणसाने सगळे नैसर्गिक डोके वापरले.. जणू तो शत्रूच. त्याने एका फटक्यात पानिपतच केले. इतका मोठा धक्का होता कि परत म्हणून निसर्गाविरुद्ध वागण्याची हिम्मत झाली नाही त्याची. मग काय डोक्याचा वापर कमी झाला. तसेही ते सगळे वापरले जातच नव्हते. आता तितकीही गरज पडत नाही. ठरवलेच तर वापरता येते, मी नाही का वापरत. प्रथमाला पर्याय नसतो त्याशिवाय, नाहीतर व्यवस्था कोण चालवणार ?अर्थात जे कमी होते त्याची जागा काहीतरी घेतेच. आम्हा सगळ्यांना सहावे इंद्रिय असल्यासारखे आहे. धोका ओळखतो आम्ही लांबूनच. कुणी संकटात असले तर आम्ही लगेच एकोप्याने धावून जातो. आत्ता शस्त्रे नाहीत हातात मग एकोपाच कामी येतो.

सकाळी उठल्यावर स्मृती कोशिका मध्ये डोकवायचे असा माझा परिपाठ आहे.आणि असे स्वतःशी बोलण्याचाही.  इतिहास कसा घट्ट आहे डोक्यात सगळ्यांच्या. स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या डोक्यात जसे कुठे अन कसे जायचे बसलेले असते तसे. जगणे आणि वंश वाढवणे. त्यासाठी पक्की व्यवस्था कायम ठेवणे किती आवश्यक आहे हे त्या काळोख्या इतिहासात पुरेपूर भरलेय. खोखो हसते कधी कधी मी एकटीच, पैसे काय.. अर्थशास्त्र काय.. देश काय... शस्त्रे काय .. महासत्ता काय.. कारखाने काय ... यंत्र काय.. यंत्रमानव काय  सगळेच विनोद. जे कृत्रिम ते चांगले म्हणे. जो सगळ्यात जास्त उर्जा वापरतो तो प्रगत म्हणे.. मिळाले काय प्रदूषण, नैसर्गिक साधनांची लुट. स्वतः संपले, सगळे संपवले. त्यांच्यासाठी वापरायचेअपशब्दही संपलेत. अति झाले अन हसू आले. कधी कधी अक्षरशः हसून पोट दुखते. उच्च नीच, जात, रंगाचे भेदभाव, त्यापेक्षा मजा म्हणजे स्त्री पुरुष भेदभाव. आता या म्हणावे बघायला या ‘पुरुषांची’ स्थिती. आम्ही जगू तर जगतील नाहीतर.. ज्या लिंगभेदावर त्यांनी डोलारा उभारला त्याचा वापर सुद्धा करायला मिळेलच असे नाही. जगण्याला तसा काही मतलबच नाही. पुरुषार्थ म्हणे .. हा हा हा हा.. हसणे थांबवायला पाहिजे नाहीतर मानसिक संतुलन ढळलेली प्रथमा निरुपयोगी म्हणून मलाच बाहेर पडायला लागायचे. 

व्यवस्थेला बाधा येईल असे काहीही चालवून घेत नाही इथे. मग चालते काय ? अर्थात फक्त व्यवस्था.२६०० साली तीच होती,२८०० साली तीच होती. आत्ताही तीच आहे. मोठ्या मुश्किलीने तग धरलाय मानव जातिने. व्यक्ती स्वात्यंत्र वगैरे बाता आता इतिहास जमा झाल्यात. समूहात राहा. समूहा बाहेर टाकले गेलात तर जगण्याची शाश्वती नाही. म्हणजे तेच अंतिम प्राक्तन असते इथे. तुमची उपयुक्तता संपली कि बाहेर पडायचे नाहीतर बाहेर काढले जाते. वेळ येतेच मग .. निसर्ग आहे तो स्वीकारायचा. तो आधीच व्यवस्थित स्वीकारला असता तर ..तिचा संबंध आला नसता. भल्या मोठ्या पोळ्यातली ती राणी माशी हसत असते जणू. तिचे जाडगेले पोट अंडी घालताना थुलथुलते. तिचा तिरस्कार वाटतो.. पण सुटका नाही.तिने ते गुळचट उग्र वासाचे खाद्य घेतले. तेच ते ‘शाही’ खाद्य  तिने घेतले कसले तिला भरवले तिच्या सेवेतल्या कामकरी माशीने. आता तिथेच ती घाण करेल. साफ करेल सेवेतली माशी. तिचे काम एकच खा, घाल अंडी पुन्हा खा पुन्हा घाल अंडी २०००-३०००. हीच ठरविणार नर कोण. मादी कोण. तिचा तो दासींनी भरलेला महाल, त्या राणी साठी खास खाद्य बनवतात आयुष्यभर तेच खायचे तिने.तिला तरी काय म्हणायचे बिचारीला. कधी तरुण असताना अठवडाभर उडाली असेल काय ते. तेव्हाच तिचे नर तिला भेटले. जणू मृत्यूला भेटले.. मेले, ही जगली. फार जगते बाकीच्यांपेक्षा. सगळ्यांना मारून जगते. या दासी ,पोरीच तिच्या . तिनेच त्याना दासी बनायलाच जन्माला घातले. नवीन राणी  होण्यासाठी खास अळीला तेच ते महान .. शाही खाद्य घालतात तिच्या पोरी. आपल्यातल्या एकीला मोठे करतात राणी बनायला .ही तिलाही हाकलून देईल. एका पोळ्यात दोन राण्या शक्यच नाही. ती नवीन राणी होऊ शकणारीही कोशातून बाहेर येताना प्रतीस्पर्धी कोणी असेल तिला कोशातच किंवा बाहेर येताच मारून टाकते. ही राणी थंड डोळ्यांनी बघते, हिचे सरंक्षण दासी करतात. मग ती नवीन राणी आपल्या त्या विजय्ध्वनीने सगळ्या कामकरीना  अंकित करून जुन्या राणीला मारून पोळे ताब्यात घेते, नाहीतर नवी वसती करायला बाहेर पडते.

असे एक भले मोठे पोळे इथे प्रत्येक भल्या मोठ्या घरा बाहेर असतेच. या लाकूड, डिंक, मेण, कापसाने बांधलेल्या  अगदी देखण्या वसाहत वजा घरा पुढे ते विद्रूप दिसते. आणि प्रत्येक पोळ्यात ती असतेच ती नसेल तर लगेच ते पोळे उध्वस्त होईल. तिचे अस्तित्व हे त्या कामकरींसाठी महत्वाचे आणि आमच्यासाठीही ..तिला हे  माहिती आहे . म्हणूनच ती हसते आहे. प्रत्येक वसाहतीच्या प्रथमाला हा ताण आहे कि समजा उद्या जर तिचे आत्ताचे हे नुसते हसण्याचे भास, खरोखरचे हसणे झाले तर ..

या विचारा सरशी माझ्या कक्षाला लागून असलेल्या कक्षाकडे लक्ष जातेच. तीच आमच्या वसाहतीची सर्वेसर्वा.जसे तिथे तसे अन तेच इथे. तिथे प्रथमा नसते आणि कुणाला डोके नसते त्यामुळे मला होणारा त्रासही कुणाला होत नाही असो ,फार वेळ गेला तिची सकाळची हालहवाल बघायलाच पाहिजेच आहे.. दारातूनच डोकावले. तीच तिरस्काराची भावना दाटून आली. पूर्वी म्हणे ‘आई – मुलं’ असे काही तरी महान नाते होते. आता ..हं .. म्हणे आई. अवाढव्य पोसलेली रंगीबेरंगी कपड्यातली ती पसरलीय. तीच्या मुली तिच्या दासी तिच्यापुढे वाळक्या चिपाडासारख्या दिसतात मी ही तशीच . पांढर्या झग्यातल्या आम्ही, हे रंगहीन झगे नाही घातले काही तरी कोण बघणार आहे? आमच्याकडे बघावे असे काही नाही अन बघणारेही कुणी नाही. तिच्याकडे बघवत नव्हते पण तिला नटवले जाते. तिच तर वंश चालवते जुळी, तिळी जन्माला घालते. आमच्या जगाण्याचा आधार. तिच्यामुळेच काम असते. तिला जगवण्याचे, साफ ठेवण्याचे काम. तिने जन्माला घातलेली मुले सांभाळण्याचे, वसाहत साफ ठेवण्याचे, अन्नसाठा करण्याचे, रक्षणाचे काम, मला व्यवस्थापनाचे काम . काम आहे म्हणून जगतो. काम संपले कि आयुष्य संपले. नुसते कर्तव्यच. नाही तर जिवन पुढे कसे चालणार? केव्हढी क्रूरता. काय पाप झाले? कोणी केले ? भोगतय कोण ?प्रश्न रोज पडतात. मेंदूत नाचतात. माणूस आहे मी. फार जुनी गोष्ट झाली ती. सध्या तरी किटकाचे जिणे जगल्यासारखे वाटते.

कशाला नुसते जगण्याचा हा पर्याय स्वीकारला त्यावेळी ? त्यापेक्षा मानव जात नष्ट होऊन नवीन काही उत्क्रांती झाली असती तर बरे झाले असते. काय तर म्हणे मधमाश्यांचे ते शाही खाद्य एकाच स्त्रीने आयुष्यभर खायचे आणि स्वतःला पोसवायचे. त्या खाद्यातली प्रथिने स्त्रीबीजे पक्व करतात, तिची प्रजनन क्षमता वाढवतात. आयुष्य वाढवतात. राणी बनवतात. त्यातही ते अन्न एखादिलाच उपोयोगी पडणार. सगळ्या लहान मुलीना सुरुवातीला द्यायचे. जिला उपोयोग होतो ती भराभरा वाढायला लागते. तिला बाजूला काढायचे. तिला ते खाद्य आयुष्यभर द्यायचे. ती पुढची जन्मदात्री. बाकीच्या ..’आम्ही’. गेली ५०० वर्षे तरी हेच जिणे चालू आहे. मोठ्या नाजूक संतूलनावर तोलले आहे सगळे.

शाही खाद्याचे हे गुण माहित होते आधीपासून पण त्याच्यावर संपूर्ण मानव जातीचे भविष्य अवलंबून राहील असे वाटले नव्हते. पूर्वी मधासाठी मधमाश्यांच्या कृत्रिम वसाहती पाळायचे. आता जणू त्याच आमचे जीवन पाळतात असे वाटते. ह्यालाच म्हणायचे निसर्गाचा न्याय. जितके माणसाने इतर प्राणीमात्राना वेठीस धरले तितकेच तो आता वेठीस धरल्या सारखा आहे, मिंधा आहे त्याकाळातल्या नुसार यःकश्चीत असलेल्या मधमाश्या सारख्या क्षुद्र कीटकांचा. आता खरे क्षुद्र कोण हा प्रश्नच आहे. समजा चुकून निसर्गाला इतकीही शिक्षा पुरेशी नाही वाटली आणि त्याने त्या शाही खाद्याचे स्वरूपच बदलले. त्यातली प्रथिने स्त्रीबिजावर काम करेनाशी झाली आणि परत माणूस जात नष्ट होण्याच्या मार्गाला लागली तर?? हेच तर ताणाचे कारण आहे सगळ्या प्रथमांच्या. त्यासाठीच असे वाटते कि ती राणी माशी हसते आहे खदाखदा, या ‘महान’ मानव जातीला. त्याच्या प्रतिनिधी असलेल्या ‘आम्हाला’. ‘आम्ही’ .. प्रथमा असल्याने जरा तरी डोके चालवल्याने माणूस असल्या सारखे वाटते. बाकीच्या नुसत्या आकड्यांच्या धनी . कोण त्यांचे प्रेमाने नाव ठेवणार? मुळात प्रेम करणार कोण? माझाच जीव तुटतो. त्यांना तरी काय माहिती प्रेम वगैरे. त्यांना फक्त आपल्या जगण्याचे पडलेय. त्यासाठी कामाचे पडलेय. माझेही काम करायचेय मला. मुलीना कामाला लावायचे. थोड्या आहेत का त्या? २००-२५० तरी असतील. १०० च्या जवळ पोहोचली आई आणि तीच्या जुळ्या तिळ्या आम्ही पोरी. त्यामुळे एवढ्यांचा गाडा चालवायचा.

चला रोजची फेरी व्हायला पाहिजे होती एव्हाना. 
राणी आणि माझा सगळ्यात वरचा मजला. याच्या खालच्या मजल्यापासून सुरुवात करावी. त्या मजल्यावरचे सगळ्यात मोठे एकच एक अवाढव्य दालन बाळांचे. वेगवेगळ्या वयातल्या बाळांना तिथे ठेवलय. मोठी गोंडस असतात. त्यांना पुढचे भोग माहिती नसतात, सारखीच असतात, हसतात, खेळतात. थोड्या मोठ्या झालेल्या दीदी त्यांना सांभाळत असतात.त्या उत्साही असतात, खाऊ घालतात. कपडे बदलतात. बाळाशी खेळतात. जरा आवाज चढवून बोलले कि घाबरगुंडी उडते त्यांची. मला बघायला मजा वाटते. तश्या निरागस असतात बिचार्या . त्यांना काय माहित मीही त्यांच्यासारखीच. उगाच हवा करते. तेव्हढीच मजा या रसहीन वातावरणात 
’कामाला लागा मुलीनो. १९२ खाऊ घातलास का त्या बाळांना?’
‘ हो, हो प्रथमा , म मला ही नवीनच जन्माला आलेली २४९ आजारी वाटली . तिला झाडपाल्याचे चाटण दिले.’
’ तंतारायला काय झाले? मी काय खाते का? वाटेल बरे तिचे तिलाच. खाण्या पिण्यावर लक्ष ठेवा. आपल्याकडे स्वतःला जगवणारेच जगू शकतात . कृत्रिम रितीने जगवायचे नसतेच. तेंव्हा त्या पद्धतीने काळजी फक्त घ्या .’
‘हो. हो प्रथमा’ ती घाबरतच म्हणाली. 
जाऊ दे पुष्कळ पिडले बिचार्यांना.
त्याच्या खालच्या मजल्यावर जावे. या  मजल्यावर सगळ्या जणी राहतात छोट्या छोट्या कक्षातून. बर्याचशा अन्नासाठा करायला जातात. तोही जरुरी पुरताच. आम्हाला कुठे काही विकून पैसे करायचेत, ही ही ही..असे हसण्याची उबळ येते मध्येच काही आठवले की .. तर पुढच्या मुली
‘ ८८ तुझ्या बरोबरच्या इतर जणींना घे आणि अन्नाची व्यवस्था बघा. शेतीचा जमाना विसरला माहितेय ना ? बाहेर जंगल वाट बघतेय. जा हात चालवा. पाऊस जवळ येतोय. अन्न साठा बघा.’
‘हो प्रथमा. साठा करायला सुरुवात झालीय.’
‘हे सगळ्यात महत्वाचे.चला लागा आपापल्या कामाला’.

त्याच्या खालच्या मजल्यावर जाताना का कुणास ठाऊक मला थोडी हुरहूर वाटते. खरे तर काहीच कारण नाही. सगळे ‘पुरुष’ या मजल्यावर राहतात, आहे ते इथेच जन्माला आलेले, ज्यांना बाहेर राणी मिळाली नाही किंवा शोधायची संधी यायची आहे असे. त्यांचे काही नाही. खरेतर कोणाचेच काही नाही. असून काही उपयोग नाही. पण.. शरीर असे वांझ असले तरी मन .. त्याचे काय ? आणि ते मलाच आहे. तिथल्या इतरांना नाही. ते राणी बरोबर आलेले. तिला आवडलेले. तगडे तरुण. राणीने त्यांना पसंद केले. त्यांचे जीवन सार्थकी लागले. काही काळ जगण्याचा अधिकार मिळाला. नाहीतर कधीही बाहेर काढले जायची टांगती तलवार घेऊन राहावे लागले असते.

पण त्यातला एक वेगळा आहे. त्याच्या कक्षा वरून जाताना धड धड होते काळजात . तो आदराने बघतो. कधी वेगळीच भावना दिसते त्याच्या डोळ्यात. नुसते डोळ्याला डोळे भिडले तरी माझा चेहरा बदलत असावा. मला एकदम जाणीव होते कि शरीर पुरेसे भरलेले नसले तरी माझा चेहरा देखणा आहे. जो त्याक्षणी आरक्त झालेला आहे. विशेषतः त्याचे डोळे बुद्धिमान वाटतात, ते समोरच्याची बुद्धी ओळखू शकतात. त्याला मनही समजत असेल? त्याचेही सहावे इंद्रिय माझ्यासारखे तरल होते का? त्या कल्पनेने कसा अलवार होऊन जातो तो क्षण. मी सगळे विसरते. जबाबदारी, ताण, विफल आयुष्य, सगळे धुक्यासारखे विरून जाते. असे वाटते तो असाच माझ्या कडे बघत राहावा अन मी त्याच्याकडे,. त्याक्षणी संपून जावे सगळे. अर्थात असे होत नाही. मी पुढे जाते. तो त्या निर्बुद्ध राणीने निवडलेला ‘पुरुष’ आहे. त्याला त्याचे भोग आहेत आणि मला माझे. 

स्त्रीचे मन परत गुंडाळून ठेवले जाते आणि व्यवस्थापिका प्रथमा आपली जागा घेते.
‘१२९ सगळे ठीक आहे ना? राणीकडे जायचा दिवस आहेआज. जाणारा आरोग्यपूर्ण असेल असे बघ. कुणी आजारी असेल तर सरळ बाहेर काढ. आपल्या अन्नासाठ्यावर अवाजवी ताण नाही ना पडत यांचा?’
‘ सगळे ठीक आहे प्रथमा. काही वाटलेच तर सांगते. आज याची पाळी आहे .’
तिने त्याच्याच दिशेने केलेला हाताचा निर्देश बघून मनात कळ आली आणि डोळ्यात आले त्याला बहुतेक पाणी म्हणत असावेत. पहिल्यांदाच ते आले. त्याच्या व्यतिरिक्त कुणाला ते म्हणजे काय ते कळले नाही. त्यामुळे त्यांना ते पाणी दिसले तरी फरक पडत नव्हता.
‘ कसला कचरा आहे इथे १२९. डोळ्यात काहीतरी गेले बघ माझ्या डोळ्यात.’ एव्हढे म्हणून भागले. 
क्षमा असावी प्रथमा, इथे कचरा कसा काय? आख्खी वसाहत अगदी स्वच्छ असते. मला काही समजत नाही. पण मी परत सफाई करून घेते.’
 ‘ ठीक आहे १४५ च्या अखत्यारीत आहे ना सफाई ? तिला म्हणावे मुली काय टिवल्या बावल्या करतात का बघ.’ उगाच डाफरून रूद्ध मनाला सावरायची संधी दिली. आणि एकच कटाक्ष त्याच्याकडे टाकून चटकन बाहेर पडले. त्याच्याही नजरेत अनोळखी ओळखीचे बरेच काही होते आणि माझ्याही. आता हलणे भाग होते. शरीराने त्यापेक्षा मनाने.
इथून पुढे खाली जायचे म्हणजे पुढची तजवीज करायची. या सगळ्या भागाला विशेष महत्व आहे. इथे भावी राणी तयार होत होती. अगदी सुंदर, शेलाट्या कमानदार बांध्याची. बघताच जीव खुळा व्हावा वरच्या मजल्यावरच्या एखाद्याचा. हीसुद्धा पुढे अशी बेढब ढोली होणार आहे. आता मात्र तिचे नखरे अगदी अफलातून. तिला छान सजवले आहे.
‘काय २०० राणी व्हायला अगदी सज्ज आहेस’
‘इ ...  प्रथमा २०० वगैरे काय राणीच आहे मी. राणी म्हण मला तुझ्यासारखीला काय समजणार म्हणा राणी म्हणजे काय असते ते’
बघा एवढे झटके बसले तरी मानव वैशिष्ट्य असलेला हा अहंकार आहेच हिला. मी काय बोलणार हिला? असू दे भावी राणीला हेही ‘गुण’ पाहिजेच. मी सरळ पाठ फिरवून बाहेर पडले. तिथल्या सेविकेशी बोलायला लागले.
’७४ मला सांग. ही तयार आहे ना?’
‘ हो प्रथमा. म्हणशील तेव्हा बाहेर पाठवू शकतो. ५० जणी बरोबर देऊ तिच्या नवी वसाहत करू शकतील अशा . ’
‘नको. माझ्या मनात वेगळाच विचार आहे’

मी परत वर गेले.जाता जाता थोडे खाल्ले. वरती अन्नाच्या मजल्यावर सगळ्या मजा करत होत्या. मुली नाचत होत्या. काही गात होत्या. यांना काही चिंता वगैरे नसते. आजचा दिवस आनंदात जगतात. मी ही त्यांच्या आनंदात सामील झाले. फार काळ रमता येत नाही. वर जाणे भाग आहे. एक महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे. एकदम वरचा मजला गाठला. राणीच्या कक्षात जाताना रक्षकाचे काम करणाऱ्या ५, ७, १५, २८ , २५ ज्या तिथे दिसल्या त्यांना आवाज दिला. आम्ही सगळ्या मिळून तिच्या समोर उभ्या राहिलो. ती दचकलीच. तिच्या सहाव्या इंद्रियाने धोक्याचा संदेश दिला बहुतेक. 
ती एकदम आक्रमक पवित्र्यात समोर उभी राहिली.
‘काय ग प्रथमा तुम्हा सगळ्यांना उद्योग नाही का? चालत्या व्हा सगळ्या. मला आराम करू द्या. राणीचा हुकुम आहे हा. नाही तर..’
‘नाहीतर काय राणी? तुला सगळे माहिती आहे,आम्ही इथे का उभ्या आहोत. तुझे सहकार्य अपेक्षित आहे.’
‘ हो माहित आहे. ती दुसरी तयार झालीय ना आता. आईच्या मुळावर उठली. तिला तुम्ही बाहेर पाठवणार होता ना? थांब या माझ्या पोरी पाठवून तिला मारूनच टाकते. राणीसाठी तेव्हढे करतीलच त्या. अग फक्त गेल्याच वेळी मी एक मुल जन्माला घातले .काय करणार ? जागाच नाही इथे. तिला बाहेर काढा. तिच्याबरोबर अजून काही जणी पाठवा. इथे जागा करा. मग अपोआप तिळी होतील. मी २५० वेळा प्रसवले.अजून प्रसवीन मी. प्रथमा तुही माझीच ना? प्रत्येकवेळी त्या क्षुद्र कीटकांच्यासारखेच वागायचे का आपण?माणसासारखे वागायचे नाहीच का?’
‘तूला कळतंय पण वळत नाही राणी. हेच असाच चालले आहे. ज्या मनुष्यत्वाची तू आता आठवण करून देत आहे. ते असते तर तू आईचे प्रेम दिले असतेस आम्हाला. दासी सारखे वागवले नसते. त्यामुळे वास्तवाला सामोरी जा. वंश सातत्य राखण्याचे काम आहे तुझे आणि तो वंश आरोग्यपूर्ण असावा हे बघणे हे माझे काम. मागच्या वेळच्या तीळ्यातली एक अपंग निपजली. त्या आधीच्या जुळ्यातली एक जन्मतःच मेली. अलीकडच्या बऱ्याच जन्मलेल्या आजारीच असतात. हे असं चालणार नाही .’
‘दुष्ट आहात तुम्ही सगळे, तेही दुष्टच होते. मला असे बनवले. फक्त जन्म देणारे यंत्रच जणू.खरी यंत्र बनवणे बंद केले. म्हणून खरी माणसेच यंत्र बनवली. आता माझा वापर झाला, तर द्या फेकून. ’
‘ आम्हालाही त्याच मार्गाने जायचं आहे. आधीचे सगळेही निसर्गाविरुद्ध युद्ध करण्याच्या बाता मारून त्याच मार्गाने गेले. हे सगळे आम्ही केले नाही. नैसर्गिक संक्रमण होण्याच्या मार्गावरचा तो एक टप्पा होता. होईल बदल हळूहळू . तरी आमच्यापेक्षा जास्तच जगलीस तू . मोह सोड आता. सहज होऊ दे सगळे . तेव्हढे तरी माणूसपण टिकव. कीटक खूप क्रूर असतात ग.’ 
एका दिवसात दुसर्यांदा अश्रू येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करायला लागला मला. गेली ती काहीही न बोलता. काहीतरी कालवाकालव झाली हृदयात. माणूसपण शिल्लक असल्याच्या खुणा दिसतात अधून मधून.

’२५ तुला पुढे काय करायचे माहित आहे. म्हणजे ती स्वतःच ठरवेल. राहते म्हणाली तर राहू दे. राहील एका कोपर्यात. ती काही जड नाही. तिचा विषय संपलाय.’ झटकन वळून आधीच्या राणीच्या सेवेतल्या मुलीना धक्यातून बाहेर काढले पाहिजे. नाही तर उगाच त्या नवीन राणीच्या सेवेत कुचराई करायच्या . स्वामी बदलला तरीसुद्धा सेवा करणार्याना त्रास होतो. ’४२ आता नवीन राणी येते आहे. तिच्यासाठी जागा साफ करा. नवी सजावट करा. तिला नटवून इतमामाने घेऊन या. सगळ्यांना नवीन राणी आलीय हे कळले पाहिजे.तिला बाहेर जाऊ दे. मोकळे मनासारखे जगू दे. तिच्या आवडीचे पुरुष शोधेलच ती. तिच्या सगळ्या गरजा पुरवा. चांगला वंश देईल ती’. नशीबवान आहे ती.
आता मला माझ्या जागी कुणीतरी शोधायला पाहिजे. सगळे समजून सुद्धा डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. मोठे अवघड काम आहे. सगळ्यात राहून असे लिप्त अलिप्त राहणे कसरतीचे आहे. राणी ला जो नियम तोच प्रथमाला लागू. नवीन राणी नवीन प्रथमा. तश्या एक दोन जणी हेरून ठेवल्यात. हुशार आहेत. बुद्धी, सहावे इंद्रिय सगळे तल्लख आहे. त्यातली एक तर मला विशेष प्रिय आहे. तिच्याशी बोलताना मला आनंदाचे भरते येते. एकदम खालच्या मजल्यावर जायला हवे तिच्यासाठी. जाता जाता सुरक्षा रक्षकांशी सुद्धा बोलायला पाहिजे. त्याच मजल्यावर आहेत त्या.
‘ २ तुझ्या हाताखाली पुरेश्या रक्षक आहेत ना? राणी बदलत आहे सगळे सुरळीत व्हायला पाहिजे. कुठेही काही गोंधळ व्हायला नको. जुनी राणी इथेच राहील कादाचीत. इथेच तुमच्या मजल्यावर शेवटच्या कक्षात ठेवा. लक्ष असू दे.’
‘ हो जी जबाबदारी द्याल ती पार पाडली जाईल प्रथमा.’
मग माझे अतिशय प्रिय काम. तो कक्ष अतिशय सुंदर होता. खिडकीतून छान फुललेली सायलीची वेल होती. त्या फुलांचा सुगंध प्रफुल्लीत करत होता. सगळ्याच गोष्टी बदलत नाहीत. ही किती आश्वासक गोष्ट आहे. तीच फुले तोच सुगंध, तोच आनंद शतकानु शतके. मुलीने तो कक्ष किती छान सजवला आहे. बाहेरची फुले आणून रचना केल्यात. साफ बिछाना. सगळ्यात सुंदर तिचा सायली सारखा हसरा चेहरा, वेगळ्याच जगात नेणारा. सगळे व्याप ताप विसरायलाच जणू तिची नेमणूक आहे. साया, मी तिला नाव दिलेय. किती शतकांनी एका मुलीला नाव मिळाले. ‘साया, कशी आहेस बाळ?’ ती एकदम येऊन गळ्यात पडली. प्रेम, वात्सल्य म्हणून जी काही संवेदना असते. ती मनाला व्यापून राहिली. अशी ही एकटीच. माझे, तिचे भाव बंध कधी निर्माण झाले ते कळलेच नाही. इतरांना वाटत होते मी तिला प्रथमा बनण्याचे धडे देते आहे. इतकी वर्ष तिच्या जन्मा पासून ती माझ्या संन्निध आहे.पहिल्यांदा मी तिला बघितले इतकी गोड हसली ती की माझ्या आतून आतून काही उमाळे फुटल्यासारखे वाटले. मग ती माझीच झाली. दिवसभरात फक्त तिच्या सहवासातला काळ फक्त मला जागल्या सारखे वाटते. लहान पंचे तिच्या बाळ लीला, बोबडे बोल. फक्त एकदाच मी तिला ‘आई’ म्हणायला लावले होते. अंगावर रोमांच आले तिच्या मुखातून तो शब्द बाहेर पडताच. माझी साया ..

तिचे खाणे पिणे माझ्या देखरेखी खाली झाले. अगदी साधा सात्विक आहार दिला. ते शाही अन्न चुकून सुद्धा तिच्या पोटात जाऊ दिले नाही. या सगळ्या काळजीने ती छान बाळसेदार झाली होती. कुणाच्या नजरेवर ते येऊन पुन्हा राणी बनण्याच्या ‘महान’ प्रक्रियेत ती अडकू नये म्हणून घोळदार कपडे घालायचे तिला. पण अखेर तो दिवस आला माझी साया एका देखण्या तरुणी मध्ये परावर्तीत होत होती. माझ्या मनात एक आस होती. पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत असलेली आस. त्यांनी नुसती इच्छा धरली मी तसे प्रयत्न केले. सगळे शाप उःशापात बदलण्याची ही इच्छा कि स्त्री नैसर्गिक रित्या परिपूर्ण व्हावी. होईल असे? पूर्वी होता तो देवाचा आधार ही आता नसतो. खूप वास्ताव वादी आहे सगळे. निसर्गैच्छा बलीयसी. आणि तिने सांगितले ते . जे ऐकायला कान तरसले होते.

‘ प्रथमा आज काही वेगळे झाले. स्मृती कोशिकामध्ये कळले मला. मी आज पूर्ण स्त्री झाले. तुला सांगायला मी उतावीळ झाले होते.’ आणि ती चक्क लाजली. तेच म्हणतात त्या विभ्रमाला. मला आनंदाचे भरते आले. अखेर निसर्ग प्रसन्ना झाला तर.
‘ साया जिंकलेस पोरी. माझा जन्म सार्थकी लागला, नव्हे मनुष्यजातीची इतक्या शतकाची तपश्चर्या सफल झाली. तुझ्या वर आता मोठीच जबाबदारी आहे मुली. एका वळणावर आपण उभे आहोत इथून पुढची वाटचाल आता तुझी आहे. योग्य मार्ग निवड आणि मानव जातीला चांगल्या मार्गावर पुढे ने. दुर्गुण त्यागून तावून सुलाखून निघालीय अखिल मानव जात.तुझ्या रूपाने पुन्हा एक नवे पर्व सुरु होते आहे. आता बाहेर पड. तू अगदी सुयोग्य जोडीदार निवड. बुद्धिमान, शूर असा आणि दूर कुठेतरी आपले जग वसवा. माणसांचे जग , कीटकांचे नाही.’
‘म्हणजे तू येणार नाही ? मला एकटीला नाही जायचे. तू पण चल.’
‘जा साया. नवीन राणीचे काही फतवे जरी व्हायच्या आत बाहेर पड .’  हे म्हणताना दोघी रडत होतो. आनंदाने आणि दुखाणेही.पूर्वी मुली सासरी जाताना असेच काही होत असेल. आणि साया गेली नव्या जगाच्या दिशा शोधत, नाही नवे जग तयार करत... कारण तिची दिशाच वेगळी आहे.


-    डॉ सुनीता बागवडे, १३६९ कसबा पेठ, पुणे ११, मोबा. ९७६७५५७३५६

Thursday, December 18, 2014

फकीरी सोंगटीचे रहस्य - डॉ. मंदार अक्कलकोटकर

फकीरी सोंगटीचे रहस्य
 डॉ. मंदार अक्कलकोटकर

प्रो. बद्रीनाथ आज खूपच आनंदात होते. स्वत: च्या हाताने शाडू मातीची ओबडधोबड मूर्ती केल्यावर लहान मुलाला जसा आनंद होतो तसाच काहीसा निखळ आनंद प्रो. बद्रीनाथ यांना झाल्यासारखे वाटत होते. त्याचे कारण त्यांची लाडकी लेक सुलक्षणा व हरहुन्नरी तरुण सहकारी कमलेश यांनाच फक्त माहिती होते.  पत्नी राधाबाई या प्रो. बद्रीनाथांच्या शास्त्रीय प्रयोगांपासून जरा दोन हात लांबच राहायच्या. प्रो. बद्रीनाथांच्या प्रयोगशाळेकडे म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीकडे फिरकत देखील नसत आणि प्रो. बद्रीनाथांच्या विविध प्रयोगांकडे थोडक्यांत नसत्या उचापत्यांकडे लक्ष वेधल्यास हे नादीष्ट आहेत इतकेच म्हणून हसून विषय बंद करत.
खरेतर राधाबाई या प्रो. बद्रीनाथांच्या अगदी सुरुवातीच्या लेक्चररच्या नोकरीच्या काळातल्या एक विद्यार्थिनी होत. स्वत: वर सतत प्रयोग करणा-या बद्रीनाथांना जेवणाच्या खाणावळीचा डबा द्यायला तळेगांवसारख्या आडगावांत कोणी तयार नसे. कारण अन्न वैविध्याचे उपक्रम छांदिष्ट म्हणून सतत करणा-या या वेड्याच म्हणावे अशा मास्तरला एक महिना बिनमिठाचे तर दुसरा महिना बिनतेलाचे जेवण डब्यांत कोण देणार ? कधी फक्त उकडलेल्या भाज्या तर कधी फक्त कच्च्या कापलेल्या भाज्या. कधी आदीवासी खातांत त्या चिणा, सावा, कोद्रू, हारीक इ. क्षुद्रधान्यांची उकडलेली खिचडी तर कधी लोखंडाच्या कढईतील नाचणी, बाजरी चे उप्पीट. नाना त-हा. सख्ख्या नात्याचे कोणी नव्हतेंच. पण असते तरी अशा अजब आणि रोज वेगळ्याच बेचव जेवण जेवणा-यापेक्षाही त्याला तयार करणा-या स्वयंपाकी बाई किंवा माणसाला मानसिक त्रासच व्हायचा.
पण नियतीची इच्छा ही काही वेगळीच असते आणि अशा वेड्यांना सांभाळणारी माणसेही जन्माला आसपासच कुठेतरी आलेलीच असतांत. तर प्रोफेसरीण बाई म्हणजे आपल्या नायकाच्या पत्नी राधाबाईंची आई सुनेत्राताई म्हणजेच आपल्या प्रो. बद्रीनाथांची सासू ही अशीच सोशिक बाई. माहेरी नातेवाईकांच्या गोतावळ्यांतील मोठ्या घरांत वाढलेल्या. त्यांचे सासरेही प्रख्यांत वैद्य आणि त्यांची पथ्येही तशीच कडक. एखाद्या रुग्णांला हटकेच रागावून दही किंवा मिठाचा वास जरी घेतलांस तरी औषध देणार नाही असा दम द्यायचे. अशा घरांतल्या थोरल्या सुनबाई असणा-या सुनेत्रा ताईंना त्यामुळे प्रो. बद्रीनाथांच्या विचित्र जेवणाच्या सवयींचे विशेष असे ओझे कधी वाटलेच नाही.
भव्य कपाळाचा, गोरा पान, भारदस्त कमावलेले शरीर असणारा उंचापुरा हा तरुण शिक्षक विद्यार्थी प्रिय असल्याचे त्यांना कळलेच होते. बिन इस्त्रीचे साधे सुती स्वच्छ पांढरे कपडे घालणारा, खाली मान घालून चालणारा, टिंगल टवाळीच्या वा-यालाही न थांबणारा आणि सतत हातांत काहीतरी झाडेझुडे, मुळे, प्राणी, कागदांच्या पिशव्या नेणारा सतत कामांत आणि विचारांत व्यग्र असणारा तरुण त्यांच्या मनांत कधी कालवाकालव ही करायचा.
अचानकपणे लहानपणी वारलेला सख्खा एकुलता एक भाऊ आज जिवंत असता तर असाच दिसला असता असे सतत त्यांच्या मनांत उगाचच येवून जायचे. मग बहीणीचेच मन ते, हळूच एखादा टिपका डोळ्यांतुन काढायचा व गुपचुप पदराने पुसून टाकायचा. तर थोडक्यांत शास्त्राच्या विचारांत डुंबलेल्या मास्तरांमधे आपल्या सुनेत्राताई ही गुंतत चालल्या होत्या.
महाविद्यालयाच्या रस्त्यावरच वाटेवर सुनेत्राताईंचे भले थोरले घर, मोठे अंगण, सावलीची पडवी असलेल्या घरांत इनमिन तीनच लोक राहायचे. त्यांत राधाबाईंच्या वडिलांची म्हणजे अनंतरावांची शासकीय फिरतीची नोकरी. मग दीर्घोद्योगी सुनेत्राताई आसपासच्या पोटुशा मुली, बाळंतीणी, त्यांची गोंडस चिल्लीपिल्ली, आजारी आजी आजोबा, मुले यांची ख्याली खुशाली स्वत: हून विचारायच्या. वेगवेगळे पाचक, मुरंबे, पाक, कल्प बनवायच्या. साजूक तुपातले पौष्टिक पदार्थ बनवून नाममात्र शुल्कांत द्यायच्या. बाजारातल्या वनस्पती तुपातल्या पदार्थांपेक्षा त्यांचे लोणकढ्या साजूक तुपातले पदार्थ स्वस्तच असायचे. त्यांना यातले अर्थशास्त्र विचारले तर म्हणायच्या यामुळे घरांतले तूप संपते तरी. नाहीतरी पुराणघृताने तांब्याचे किती तांबे भरून ठेवू. आता हे म्हणजे काय असे वाचक विचारतील. तर पुराणघृत म्हणजे त्यांच्या सास-यांचा हातखंडा मलमाचा सोपा नमुना होता. कोणतीही जुनी व खराब जखम असो, गांवातले लोक या तुपाच्याच जिवावर जखमांतुन बरे व्हायचे. शिळ्या साजूक तुपाचे तांब्याचे लोटे फडताळावर फडकी बांधून वर्षानुवर्ष पडलेले असायचे. शिवरायांच्या किल्यांवर म्हणे अशा पुराण घृताचे रांजण भरलेले असायचे. घाव भरण्यासाठी फक्त तूप लावायचे. मग जखमेत पू होत नाही आणि जखमेचा डागही राहांत नाही. आजही घरी खाटेवर पडून असणा-या जुनाट बेड सोअर्स च्या जखमांना, भाजलेल्या, कापलेल्या जागी हे सोपे मलम वापरले तरी आराम पडतो.  तर असो पुराण घृताचे पुराण पुरे करु कारण ते आपल्या मूळ विषयाकडून आपल्याला दूर न नेवो.
आपल्या लाडक्या लेकीच्या मास्तरांच्या म्हणजे प्रो. बद्रीनाथांच्या खाण्यापिण्याच्या गमती राधा व तिच्या मैत्रिणी जेव्हा घरी बोलायच्या तेव्हां सुनेत्राताईंना वाईट वाटायचे. कधी जेवणाच्या वेळी डझनभर पिकलेली केळी खाणे किंवा कधी मक्याची कणसे, बटाटे, रताळी किंवा डझनभर हिरवी कच्ची केळी आणि कधी अंडीसुध्दा प्रयोगशाळेतील चंचुपात्रांत उकडुन तिखट मिठाशिवायच हे गुरुजी मिटक्या मारत खातांत हे कळल्यावर मात्र त्यांना राहावेना.
एक दिवस जेवणाच्या सुट्टीत त्या प्रो. बद्रीनाथांना भेटायला प्रयोगशाळेंत गेल्या आणि आपल्या डोळ्यांने त्यांचे जेवणाचे प्रयोग म्हणजे खरे तर हाल पाहीले. प्रो. बद्रीनाथांच्या सगळ्या अटी मान्य करुन त्यांना हवा तसा, हवा तेव्हडा, हवा तेव्हा डबा आणि तोही प्रो. बद्रीनाथ म्हणतील त्या किमतींत देण्याचे मान्य केले. नादीष्ट प्रो. बद्रीनाथांना चांगलेचुंगले जेवण म्हणजे काय हे खरे तर ठावूकच नव्हते. सुनेत्राताईंच्या घरचा चौरस डबा व रात्री घरीच जेवायला गेल्यावर पाटावर बसून पुढे ठेवलेल्या चौरंगावरच्या मोठ्या ताटातील षड्रसयुक्त साग्रसंगीत अन्नकोट. मग काळाच्या ओघांत प्रो. बद्रीनाथ आपल्या खाण्याच्या अटीच विसरुन गेले नसतील तरच नवल. पुढे ते सुनेत्राताईंना म्हणू लागले की तुम्हाला हवा तसा तुम्ही रोज कराल तोच डबा देत जा. मला हे सगळेच आवडते. हे ऐकल्यावर कोणत्याही मातेचा ऊर भरुनच येणार. तर काय आपले नायक प्रो. बद्रीनाथ सुग्रणीच्या हातचे अन्न खायला नादावले आणि थोडे माणसांत येवू लागले. अनंतरावांना हा बुध्दीमान तरुण आपल्या घरांत वावरतो त्यामुळे परगांवी असले तरी घराची चिंता कमी झाली. कधी घरी असताना रात्री उशिरापर्यंत या दोघांच्या गप्पा चालायच्या आणि त्यातून घरांत राधाबाई आणि सुनेत्राताईंनाही काव्य, शास्त्र, विनोदासह विज्ञानाचीही खोली समजायची. दिवस आनंदात चालले होते. प्रो. बद्रीनाथ साक्षांत अन्नपूर्णेच्या म्हणजे सुनेत्राताईंच्या हातच्या चविष्ट आणि रोज काहीतरी नवीन पदार्थ खावून तृप्त होवू लागले आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतांत तो हाच काय असे त्यांना जणू वाटू लागले. प्रो. बद्रीनाथांच्या स्वर्गात आता उणीव होती ती फक्त रंभा व मेनकेची, कारण स्वर्गच ना तो. पण वाचकहो स्वर्गांत इंद्राला व्दिभार्याप्रतिबंधक कायदा लागू नसला तरी प्रो. बद्रीनाथांना जरुर होता. या पृथ्वीवरच्या लोकशाहींत ऊर्वशी, रंभा, मेनका व सर्वकाही एकीतच काय ते लग्नापूर्वी बघून घ्यायला हवे. नंतर तक्रार नको. त्यांत सुनेत्राताईंच्या हातच्या सुग्रास भोजनाचा मोह. इकडे त्याचवेळी सुनेत्राताईंच्या मनांत त्यांच्या स्वप्नांतला जावई प्रो. बद्रीनाथांच्या रुपांत जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सतत दिसायला लागला. शेवटी व्हायचे तेच झाले. मागणी सासुबाईंनी घातली का प्रो. बद्रीनाथ विरघळून आपणहूनच साजूक तुपाच्या रांजणात आकंठ डुबले ते जरा नक्की माहीती नाही. पण प्रो. बद्रीनाथ चतुर्भुज झाले. सुनेत्राताईंचे व अनंतरावांचे डोक्यावरचे ओझे हलके झाले आणि या गडबडीत कधीतरी राधाबाईंना सुलक्षणा नावांची गोड मुलगी होवून गेली. असो. आपला विषय कोणाच्या लग्नाच्या इतिहासाचा नसून वाचकांची उत्कंठा ज्याच्यापाशी अडली आहे त्या प्रो. बद्रीनाथांच्या आनंदापाशी येवून थांबला आहे. तर आता प्रो. बद्रीनाथांना कसला इतका आनंद झाला ते पाहू.
  त्याचे असे झाले. निसर्गप्रेमी बद्रीनाथांनी फार पूर्वी मित्राच्या नादाने मध्य रेल्वेच्या बोर घाटातील खंडाळा रेल्वे स्टेशनजवळच्या तलावानजिक गावठाणांत दोन गुंठे जागा विकत घेतली होती. नोकरी व्यवसायातून वेळ मिळाल्यावर टुमदार कौलारु चार खोल्यांची एकमजली बंगली बांधली होती आणि आठवड्याची अखेर ते तेथे घालवण्यासाठी आग्रही असत. मुलीच्या मैत्रीणी, घरचे नातेवाईक यांनाही शहरापासून दूर विरंगुळ्याची सोय झाली. सुनेत्राताईंना स्वयंपाकाचा कधी कंटाळा नव्हतांच. घाटांतला रानमेवा खाणे हा सुट्टीतला मुलांचा आनंदाचा ठेवा होता. हे सर्व पाहूनच प्रो. बद्रीनाथ आनंदून जायचे.
कमलेश हा शेजारच्या आमराईतील जुन्या शंकराच्या मंदीराच्या पुजा-याचा पितृछत्र हरवलेला व त्या पुजा-यांच्या भाषेत काहीसा उनाड भाचा. कमलेशला प्रो. बद्रीनाथ भावले तर प्रो. बद्रीनाथांना कमलेशच्या रुपांत मिळाला एक तरुण, उत्साही त्यांच्या सारखांच धडपड्या सहकारी. आणि त्यांतच ती घटना घडली.
कमलेशच्या मामीला म्हणजे पुजा-यांच्या पत्नीला हात पाय गार पडण्याचा आजार होता. त्यांत खंडाळ्याचा धो धो पाऊस. सुरु झाला की आठवडा, पंधरवडा सतत पडायचा. त्याला उसंत अशी नाहीच. त्यांत विजेचा लपंडाव, व्होल्टेज कमी, शंभर वॉटचा दिवा लावला तर पंधरा वॉटचा उजेड पडायचा. पांढ-या दुधी प्रकाशाची नळीच्या आकाराची विजेची ट्यूब कमी दाबामुळे सुरुच व्हायची नाही. वातावरणांत दमटपणा आणि घरांत कुबटपणा भरलेला. पावसाळ्यांत कपडे कोरडे वाळायचेच नाहीत. त्यावर हिरव्या रंगाची बुरशी यायची. माणसाच्या व प्राण्यांच्या पण अंगावर बुरशी येत असणार. दिसायची नाही इतकीच.
तर अशाच एका पावसाळ्या अंधा-या रात्री कमलेशच्या मामीला खूप थंडी भरुन आली. नाडी लागेना. डोळे उघडेना. मग मामांनी कमलेशला सरकारी डॉक्टरांना आणण्यासाठी पिटाळले. डॉक्टर जागेवर नाहीत म्हटल्यावर कमलेश बद्रीनाथांची दुचाकी घेवून घाटातल्या नागनाथाच्या गुहेत नेहमी राहणा-या आणि कधीमधी खंडाळ्याच्या भजी पॉइंटच्या मागे राजमाचीच्या रस्त्यावरच्या जुन्या देवळांत राहणा-या साधूकडे गेला. जाणकार साधूने तळहातावर मावेल एवढी सहाण काढून स्वच्छ धुतली. भगव्या झोळीतून एक चमचमणारे सोनेरी कण दिसणारी भुरकट रंगाची असणारी सोंगटी काढली. सहाणेवर पाच दहा थेंब पाणी टाकून त्यावर सोंगटीचे वळसे ओढले. त्याचे इतुकेसे गंध  कमलेशच्या हातातल्या चांदीच्या डबीत घातले आणि ते गंध आले तुळशीच्या रसांत घालुन जिभेवर किंवा जिभेखाली घासून जिरव असे सांगितले. कमलेश घरी येईपर्यंत मामांनी आले तुळशीचा रस काढूनच ठेवलेला पाहून कमलेशलाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहीले नाही. गडबडीत प्रश्न न विचारता त्याने डबीमध्ये तो रस कालवला आणि मिश्रण जिभेवर चाटवले. या वेळेपर्यंत मामीच्या पापण्या अर्धवट बंद , बुबुळे वर चढलेली व थंडपणे निर्जीव दिसणारी, हातपाय गार पडलेले, मनगटाची नाडी लागते न लागते अशी गप्प, छाती श्वासाबरोबर हलत होती की नाही ते कळेना. कमलेशला तर वाटले मामी गेली. पण मामा कर्मठ असूनही एक ही शब्द न बोलता प्रो. बद्रीनाथांनी आग्रह केल्यामुळे मामींच्या हातापायाला ब्रॅंडी चोळत बसलेले. त्यांनी आयुष्यांत कधी दारुला स्पर्श केला नव्हतां. पण प्रो. बद्रीनाथांचा सल्ला मानून पत्नीच्या जीवापेक्षा आपला अहंकार व तात्विक बाणा अंमळ दूर ठेवला होता.
आणि इकडे काय आश्चर्य तीन- चार वेळा चाटण दिल्यावर मामींचे हातपाय कोमट झाले. किंचित कण्हल्यासारखे करुन मग डोळे उघडुन आवंढा गिळला. घोटभर गवती चहा आल्याचा चहा चालेल का असे राधाबाईंनी विचारल्यावर किंचित हसून मान हलवली. चहा घेतल्यावर स्वेटर घातला आणि मामींनी सर्वांशी दोन शब्द बोलल्यावर सगळ्यांना हायसे वाटले. श्रध्दाळू मामा बद्रीनाथांना म्हणाले फकीराने अपमृत्यू टाळला. आजची वेळ खडतरच होती पण दुपारपासून महामृत्युंजयाचा संकल्पपूर्वक जप आणि अभिषेक केला त्याचे तीर्थ मामीला प्राशन करवले त्याचा ही उपयोग झाला असणार.
प्रो. बद्रीनाथ शास्त्रीय बुध्दीने विचार करत राहीले. चमत्कार तर झाला होताच. थंड पडलेले अंग केवळ ब्रॅंडी चोळून गरम झाले नाही हे तर नक्की. मग अ‍ॅड्रिनलीन, नॉर अ‍ॅड्रिनलीन, डोपामाईन, हायड्रो कॉर्टिझॉन, डेक्झा मिथॅझॉन इ. जीव रक्षक औषधांचे उपयोग तेही सूचिकाभरण म्हणजे इंजेक्शनच्या रुपाने जसे पाहायला मिळतांत तसा प्रभाव खेडेगावातल्या फकीराच्या कणभर चाटणाच्या उपयोगाने घडतो यातही काहीतरी शास्त्र असलेच पाहीजे. झाले. प्रो. बद्रीनाथांना हा विचार काही चैन पडू देईना. त्यांची झोपच उडाली जणू. मामांशी झालेल्या चर्चेत आणखी माहिती पुढे आली. या सध्याच्या मध्यमवयीन साधूचे गुरुही दीर्घकाळापासून अशाच फकीरी मात्रांचा उपयोग वर्षानुवर्षे करत आहेत. त्यांनीही अशा अनेक लोकांना मरताना किंवा जणू मेल्यावरही उठवले अशी वदंता गावांत होतीच. मृत्यूपत्रावर सहीसाठी स्वर्गवासी झालेल्या कोणा म्हाता-या माणसाला एक तास जिवंत केल्याचे समजले. घरातले गुप्त धन, घराण्याचा परंपरागत मंत्र मुलाला सांगावा यासाठी ऊर्ध्व लागलेल्या माणसाला पाच दहा मिनिटे बोलते करायला मात्रा उपयोगी पडल्याचे कळले. मामींसारख्या काही प्रकरणांत तर त्या वाईट काळातला अपमृत्यू टाळल्यावर मग कितीही वर्षे जगण्याची अडचण राहीली नव्हती. गरीबाचे वाली ठरणा-या आणि कर्त्या पुरुष किंवा बाईचा प्राण वाचवून घरच जगवण्याचे पुण्य त्या फकीरांना मिळायचे. मामींची नाडी लागत नव्हती. हातपाय गार झालेले प्रो. बद्रीनाथांनी स्वत:च पाहीले अनुभवले होते. मामांच्या घरातल्या आधीच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या मृत्यूपूर्वी चाटण आणवून खरा मृत्यू आहे का अपमृत्यू याचाही सोक्षमोक्ष लावला गेला होता. उपयोग न होता दगावलेल्या माणसाबद्दल फकीराचे म्हणणे त्याची वेळ भरली इतकेच होते. जगलेल्याच्या बाबतीत पण खोटा मोठेपणाचा आव नसायचा. जायची वेळ आली नाही म्हणून उठला. हजार वर्षांची जुनी जड सोंगटी हा गुरु कृपेचा प्रसाद मानला जायचा. माणसाची ईश्वरावरची श्रध्दा वाढावी आणि न मागता आपला संन्यासी पध्दतीने जगण्याचा मार्ग सोपा व्हावा इतकीच फकीराची अपेक्षा होती. उगाचच नागनाथाच्या गुहेतल्या फकीराला आठवड्याचा शिधा पाठवण्यासाठी तालमीतली पोरे पाठवली जात नव्हती. गावांत कधीमधी साप किरडू चावले, ताप चढला, बाळाचे रडणे थांबत नसेल, बाई अडली की फकीराची आठवण व्हायची आणि तो हमखास उपयोगी पडायचाच.
अर्थात कोणाच्या केवळ सांगण्यावर विश्वास ठेवून ऐकणा-यांपैकी प्रो. बद्रीनाथ नव्हतेंच. फकीराशी चर्चा करुन फार काही हाती लागले नाही. मग त्यांनी कमलेशकडून चाटणाची डबी मिळवली. ती मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनात कार्यरत आपल्या विद्यार्थ्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली. पुण्या मुंबईमधील परंपरागत वैद्यकी व स्वत: ची औषधे पिढ्यानुपिढ्या करणा-या वैद्य नानल, वैद्यपंचानन कवडेशास्त्री, बृहतत्रयीरत्न दातारशास्त्री, सरदेशमुख महाराज इ. शी शास्त्रचर्चा केली. प्रो. बद्रीनाथांचा शास्त्राभ्यास, शुध्द हेतू व संशोधनाची तळमळ पाहून सर्वांनीच मदत करण्याची तयारी दर्शवली. रासायनीक परीक्षणाचा अहवाल हाती आल्यावर, प्रो. बद्रीनाथांनी आपला मोर्चा आधी मेडिकल कॉलेजकडे व नंतर मुंबई व्हेटरनरी कॉलेज कडे वळवला. पांढरे उंदीर, गिनी पिग व सशावर प्रायोगिक स्तरावर औषधाचा आश्चर्यजनक परिणाम घडतो हे तेथील प्राध्यापकांनी मान्य केले. नाडीची गती, शरीराची उष्णता, रक्तदाब, ह्रदयाची शक्ती, उत्साह वाढतो हे कुत्र्यावरच्या प्रयोगांत दिसलेच पण दम लागलेल्या, दुर्बल ह्रदयाच्या रुग्णांवरही पुण्याच्या ताराचंद रामनाथ रुग्णालयांत प्रयोग करुन खात्री पटवली.
आधी अ‍ॅटॉमिक अ‍ॅप्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमिटर वर जड सोंगटीचे इलेमेंटल अ‍ॅनॅलिसिस केल्यावर त्यांत शुध्द सोने, पारा व गंधक असे तीन पदार्थ आढळले. पुण्या,मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आधुनिक वैद्यकातील फार्माकॉलॉजी शिकवणा-या प्राध्यापकांनी या औषधाबद्दल माहिती नसल्याचे सांगून माफी मागितली. त्यांत त्यांची काही चूक नव्हती. इंग्रजी औषधांच्या पुस्तकांत सोने पारा गंधकाच्या औषधांबद्दल उल्लेखही नव्हतांच. पण परंपरेने आयुर्वेद वैद्यकी करणा-या वैद्यपंचाननांनी ग्रंथ संदर्भ दाखवले. रसरत्नाकर, रसेंद्रसारसंग्रह, रसचंडांशू, रसतरंगिणी, रसरत्नसमुच्चय अशा अनेक आर्य ग्रंथांमधील पाठांचे चर्वित चर्वण झाले आणि तो आजचा दिवस उजाडला. हजारो लाखो वर्षे टिकू शकणारा, एक्सपायरी नसणारा, महाप्रतापी असा हेमगर्भ रसाचा स्वत: च्या पोटामध्ये म्हणजे गर्भांत हेम म्हणजे सोने सांभाळणारा हेमगर्भ औषधाचा एक आगळावेगळा प्रयोग त्यांनी अनुभवला होता. आधुनिक काळांत इंटेन्सिव्ह केअर क्लिनिक- आयसीयू आहेत. पण त्यामध्ये भरती करण्यापूर्वी किती रक्कम भरायला लागते आणि ती कोठून आणायची हे सामान्य अडाणी माणसाच्या डोक्याला झेपत नाही. खेड्यापाड्यांत राहणा-या आदीवासी, मजदुर, शेतकरी माणसाच्या प्राणाला वाचवण्यासाठी हेमगर्भ, सूतशेखर इ. मात्रांचाच उपयोग होत राहणार.
आता वाचकांनीच ठरवावे की अशा गुणकारी औषधाचे रहस्य आणि फकीरी मात्रेचे शास्त्रीय गुपीत उघडकीस आल्यानंतर प्रो. बद्रीनाथांचा आनंद गगनांत मावेनासा होईल का नाही.  

डॉ. मंदार अक्कलकोटकर
असोसिएट प्रोफेसर (प्रपाठक), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे