जेव्हा इंधन शिल्लक नसेल ---
इसवी सन २०२७ची सकाळ!
पाऊस पडतोय. आज पुन्हा
तुम्हाला ऑफिसात चालतच जायला लागणारे. लोकल खचाखच गर्दीने भरलेल्या. बस म्हणजे
लटकत जायचं. ओल्या रस्त्यांवर दुचाक्या घसरणार. एक बरंय की तुम्हाला फार लांब
जायचं नाहीये. तुमच्याकडे छत्री आहेच आता ती खोला आणि निघा.
तुम्ही नशिबवान आहात, तुम्हाला
अगदी घराजवळची एक बहुमजली इमारत पाडण्याचं काम मिळालंय. वीजेअभावी मोठमोठ्या
इमारतींमध्ये राहाणं नरकात राहाण्यासारखं झालंय. लोक साध्या, छोट्या छोट्या, एक
मजली खुल्या हवेशीर इमारतीत राहायला लागलेत. आता या मोठमोठ्या इमारती पाडण्याचं
काम झपाट्यात चालू आहे कारण पृथ्वीच्या पोटातली सगळी खनिजं उपसली गेली आहेत आणि गरज
पडली की त्यांच्यात पडून राहिलेलं पोलाद काढून घेतलं जातंय. आपल्या या महालांना
आपणच तोडायचं आणि गरज पडेल तसा माल काढून घ्यायचा. पेट्रोल आणि वीज यांच्याप्रमाणे
कोळसादेखील संपलाय. अणुइंधनाचा वापर घातक शाबित झालाय. सौरऊर्जा अव्यावहारीक
होतीच.
दहा वर्षांवरचे पोरंपोरीं
अजून मोटारी विसरलेले नाहीत. जेव्हा पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या ते
दिवस म्हातार्यांना आजही आठवतात. रस्त्यांवर धावणार्या मोटारींची संख्या झपाट्याने
रोडावत होती. पेट्रोल खरेदी सामान्यांच्या आवाक्यातली बाब राहिली नव्हती. काही
मोजके श्रीमंत लोक आपल्या मोटारी फिरवू शकत होते. मोटार ही वस्तू निर्लज्ज
श्रीमंतीचे निदर्शक बनली होती. त्यामुळे बाकी सगळे माणसे या मोटारी बघून त्रस्त
होत होते. सडकेवरून धावणार्या एखाद दुसर्या गाडीला लोक अडवत, पालथी पाडून आगही
लावत कधी कधी. मग पेट्रोलवर रेशनिंग आलं. रस्त्यावरच्या मोटारी आणखीच कमी झाल्या.
दर तीन महिन्यांनी रेशनवरच्या पेट्रोलचं प्रमाण कमी कमी होऊ लागलं.
मग एक दिवस असाही उजाडला
ज्या दिवशी रेशनिंगही बंद झालं. मोटारी होत्या तिथेच पडल्या.
मात्र अशा निराशेच्या काळातही
आशेचा किरण दिसतोय. अर्थात तुम्हाला त्याचा प्रकाश पहाणं आवडायला हवं. २०२७ सालची
ही वृत्तपत्रं तर उघडून पहा. त्यांनी छापलंय की आपल्या शहरांची हवा आता खूप स्वच्छ
झाली आहे. हवेत आता कारखान्यांच्या धुरांड्यांतून निघणारा धूर नाही की मोटारींचा
धूर नाही.
पोलिसांच्या गस्त घालणार्या
गाड्या बंद झाल्या की शहरातले गुन्हे वाढतील अशी धास्ती वाटे. पण आश्चर्यकारकरित्या
गुन्ह्यांची संख्या घटली आहे. आता पोलिस पायीपायीच
गस्त घालतात. रस्ते आता पूर्वीसारखे रिकामे राहिले नाहीत. पायी चालणारी माणसं
शहरभर दिसायला लागली आहेत. आपापल्या मोटारीत बसून एकट्याने फिरण्याऐवजी लोक
एकमेकांसोबत पायी फिरतात. ओळखीच्या लोकांच्या गर्दीत सगळ्यांना एकमेकांचे संरक्षण
मिळतंय. रस्त्यावर गुन्हे होण्याची शक्यताच आता उरली नाही.
मोसम? जर गारठा असेल तर लोक
बाहेर उन्हात बसतात. आणि गरम होत असलं तर लोक सावलीत बसतात. मोकळी हवा हाच आता वातावरण
वातानुकूल करण्याचा एकमेव मार्ग राहिला आहे. घराघरातून वीज देता येत नाही कारण ती
अगदीच कमी निर्माण होते. रस्त्यांवरचे दिवे विजेने उजळतात हेच सुदैव.
शहराच्या मध्यवर्ती भागात
राहाणारे उपनगरात राहणार्यांपेक्षा आपलं जगणं सुखाचं आहे असं मानून स्वत:चीच समजूत
घालतात. मोटारी होत्या म्हणून ही मोठी मोठी उपनगरं उभी राहीली, मोटारींमुळेच
त्याची भव्यता टिकून होती आणि आज त्याच मोटारींच्यामुळे ही महानगरे आपल्या
शेवटच्या घटका मोजताहेत. आज या उपनगरवासीयांना अनेक संकटांना तोंड द्यायला लागतंय.
रूंद सडकांच्या कडेकडेनी बांधलेल्या बंगल्यात राहाणार्या या लोकांना
खाण्यापिण्याच्या गोष्टी हातगाड्यांवरून आणायला लागताहेत. थंडगार झोंबरं वारं
सुटून बर्फ पडायला लागतो तेव्हा फारच खस्ता खायला लागतात. वीज संपली तेव्हापासून
फ्रिज म्हणजे पत्र्याचं एक कपाट मात्र झाला. त्यामुळे खाद्यपदार्थांचा साठा करणं
अशक्य झालंय. हा, तसं म्हटलं तर घराबाहेर साठलेल्या बर्फात खाद्यपदार्थ गाडून ठेवता
येतील पण मग गल्लीतल्या कुत्र्यांकडे सारखं लक्ष ठेवायला लागतं.
जे काही ऊर्जा स्रोत उरलेत
ते वैयक्तिक सुखसोयींवर उडवता येऊ शकत नाहीत. दुसरे ऊर्जा स्रोत सापडत नाहीत तोवर
देश चालवण्यासाठी लागेल ती किंमत मोजणं भागच आहे. या करताच उरली सुरली ऊर्जा
शेतीच्या कामांसाठी वापरली जातेय. मोटर कंपन्या आता फक्त शेतीची औजारेच बनवतात. कडाक्याची
थंडी पडली तर एकाच अंथरूणात एकमेकांच्या पांघरुणात झोपायला लागतं, उकडायला लागलं
तर हातपंख्याचा वारा घ्यावा लागतो. मोटारी नाहीत मात्र काही टांगे तेवढे आहेत. पण
अन्न पिकलं नाही तर काय करणार? आपली लोकसंख्या फारशी वाढत नाही हे खरं असलं तरी
धान्याचा पुरवठा सगळीकडे नियमितपणे करणं दिवसें दिवस अवघड होत चाललंय. शिवाय काही
धान्य निर्यात करावंच लागतं तेव्हा कुठे ते देश चार थेंब पेट्रोल आपल्याला देतात.
जगातले अन्य अनेक देश
आपल्याइतके भाग्यवान नाहीत हे दिसतंच्चे. इतरांच्या हालाखीच्या वाईट बातम्या
ऐकायला मिळाल्यामुळे आपणा अमेरिकन लोकांना दिलासा मिळतो, असे काही वेडपट लोक म्हणतातच
की. जगाची लोकसंख्या सतत वाढत चाललीय, म्हणून तिथली माणसं भुकेनं मरताएत. जवळ जवळ
साडेपाच अब्ज लोक आहेत जगात. आणि अमेरिका आणि युरोपच्या बाहेर वसणार्या दर पाच माणसांपैकी
एका व्यक्तिकडेही दोन वेळची भूक भागवण्याइतकं अन्न नाहीये.
पण आताचे आकडे सांगतात की
लोकसंख्या भराभर कमी होणारे. यांचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारे
बालमृत्यू. भूकबळींमध्ये यांचाच नंबर आधी लागतो. सध्या अमेरिकेतील काही
वृत्तपत्रांतून ही बाब चांगली असल्याचं मांडलं जातंय. का? कारण त्यामुळे लोकसंख्या
कमी होते ना! हो, अशा बिकट परिस्थितीतसुद्धा काही वर्तमानपत्रं अशा विकृत बातम्या
भरलेली आठ पानं बरोबर छापतात.
एक अशीही बातमी आहे की
भुकबळी पडणार्या भागांमध्ये जेमतेम दोन घास खायला मिळणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात
आहेत. या नव्या कुपोषणातून एक नवी समस्या निर्माण झालीय. अशा लोकांचं शरीर कसंबसं
चाललंय पण त्यांचं डोकं चालणं बंद होत चाललंय. अशा कमजोर किंवा विकृत लोकांची
संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या इथं काही जणांची अशी कुजबूज चाललीय की
असल्या लोकांना गुपचूप मारून टाकलं पाहिजे. त्याच्या मते ते एक ‘व्यावहारिक पाऊल’
असेल. अशा आणिबाणीच्या क्षणी पृथ्वीवरच्या या अनावश्यक बोजापासून सुटका करून घेतली
पाहिजे. असं ‘व्यावहारिक पाऊल’ काही ठिकाणी टाकलं गेलंय पण त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात
काही छापून आलेलं नाही. पण जगाच्या अशा भागातून आलेले प्रवासी असे भयंकर किस्से
हलक्या आवाजात सांगतात.
या ऊर्जा संकटानं आणखी एक
काम केलंय – प्रत्येक राष्ट्रातलं सैन्य कुठं गायब झालंय कुणास ठाऊक. मोठ्या
प्रमाणात पेट्रोल लागणारं सैन्य राखणं आज कोणाला परवडणारे? खांद्यावर बंदूक
ठेवलेले थोडे फार गणवेषधारी सैनिक कुठे कुठे आहेत अजूनही, पण आता ते पाय घासत चालतात.
घुर्रकन् उडणारी वायुसेनेची विमानं, दणदणत जाणारे रणगाडे, ट्रक, जीपा धूळ खात पडून
आहेत.
उरले सुरले ऊर्जास्रोत सतत
आटत चाललेत त्यामुळं यंत्रांची जागा हातांना घ्यावी लागतेय. यंत्रं मोडीत
काढल्यामुळं कामाचे तास वाढवण्यात आलेत आणि निष्कारण दिले जाणारे आरामाचे तास कमी
करण्यात आलेत. आता तसा आराम मिळूनही काही उपयोग नाही, कारण वीजटंचाईमुळे आराम आणि
मनोरंजनाची निरर्थक साधनंही मोडून पडलीत. चोवीस तास जाहिराती आणि कार्यक्रमांचे
रतीब घालणारा टिव्ही आता रात्री केवळ तीन तीस चालवला जातो. एका आठवड्यात सिनेमागृहातून
फक्त तीन खेळ दाखवायला परवानगी आहे. नवी पुस्तकं छापणं जवळ जवळ बंदच झालंय. २०२७ मध्ये
केवळ तीनच गोष्टी राहिल्याएत – काम करा, झोपा आणि खा. आणि शेवटच्या गोष्टीची काही
खात्री नाही बर का.
या परिस्थितीचं पुढं काय
होणार? ते पुढं नाही मागं असेल. एका अंदाजानुसार हा आपल्याला सन १८००च्या काळात
घेऊन जाईल. शहरात एकत्र आलेल्या लोकसंख्येला परत गावांकडं परतावं लागेल, छोटे छोटे
स्वावलंबी उद्योग करावे लागतील आणि छोट्या शेतांवर विसंबावं लागेल. गाजावाजा न करता
हस्तोद्योग आणि ग्रामोद्योग पुन्हा व्यवहारात येत आहेत.
आपण आज या परिस्थितीत काही
बदल घडवून आणू शकतो का? मुळीच नाही, यातून बाहेर काढेल असा कोणताही मार्ग शिल्लक
नाही. हा, जर आजपासून ५० वर्षांमागे म्हणजे १९७८ साली असे काही निर्णय घेतले असते
तर आजची २०२७ची दुर्दशा झाली नसती. आणि कदाचित १९५८ सालीच योग्य दिशेने वाटचाल
केली असती तर खूपच सोपं झालं असतं.
-
आयझेक असिमॉव यांच्या ‘टाईम’
या अमेरिकी साप्ताहिकात १९७८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा सारांश.
त्यात लेखकाने म्हंटले आहे
की “या लेखात वर्णन केलेली परिस्थिती वास्तवात येईल का सांगता येत नाही, पण आज
सारखी उधळ माधळ चालू राहिली तर ही हालत यायला फार काळ लागणार नाही.”