तिची दिशाच वेगळी
- डॉ सुनीता बागवडे
खिडकीबाहेर लांबवर पसरलेली झाडी, खास वाढवलेली फुलझाडी.
अतिशय छान दृश्य होते. त्याच्यातच विरळ विरळ असलेल्या विशेष प्रकरच्या रचनांची घरे,
छोट्या वसाहतीच जणू.
अतिशय सुबक शान्ख्वाकृतू उभट रचना. आत्ता सगळ्यात वरच्या मजल्यावरून बाहेर पहिले
मी. प्रथमा असल्याने वेळ नव्हता बघत बसायला आणि पद्धतही नव्हती.. सृष्टी सौंदर्य
त्याचा आनंद .. असं काही होते म्हणे.. आत्ता ३०५० साली व्यवस्थेचे महत्व सगळ्यात
जास्त होते आणि मी व्यवस्थापिका होते. ही कालमापन पद्धती प्रबळ होती पूर्वी. ते
घड्याळ, त्यावर बांधलेले दिवस.. माणसांसाठी घड्याळे कि घड्याळांसाठी माणूस तेच
कळेना? तो अन घड्याळ दोन्ही पळायचे. नंतर एक काळ निसर्गाने त्या पायांना असे
करकरचून बांधले कि धावणे काय रांगणेही जमेना. रांगणारे पायच जन्माला येणे बंद
झाले.
आधी नैसर्गिक आपत्तीत मृत्यू व्हायचे. माणसाने
निवारे बांधले. रोगराई, जंतूमुळे माणसे मारायची. औषधे आली. निसर्गाला शक्य तेवढे
ओरबाडून सुख स्वास्थ्य वाढवले. आयुष्यमान वाढले. मृत्यूवर मात करण्याच्या वल्गना
सुरु झाल्या. निसर्गाला कसे परवडणार? कुठल्याही एका प्राण्याला जास्त वाढू देणे
संतुलन बिघडवणार. मग त्याने जन्मच आडवला.. २१ व्या शतकात याची सुरुवात झाली.
स्त्रीबीज तयार होईनात, शुक्राणू कमी झाले. फलन होईना. मग गर्भाशयात मृत्यू पेशी
तयार झाल्या गर्भपात करणाऱ्या .. मग काय परीक्षा नळीतले गर्भ, क्लोन्स सगळे
व्यर्थ.. गर्भाशय गर्भ धारणच करेनात. स्त्री जन्म जणू व्यर्थ .. भंपक पणा नुसता.
मग आम्ही तर जन्मुच नये.
सगळे उपाय खुंटले. २२ व्या शतकात लोकसंख्या निम्मी झाली. हाहाकार
माजला. सगळी कथित प्रगती अक्षरशः शून्य झाली. त्या सगळ्या सुखसोयी भोगणार कोण?
सगळे वृद्ध मरू घातलेले लोक उरले. २३वे शतक उजाडत होते. मानवजात संपण्याचा धोका
उभा राहिला. हवालदिल झाले लोक.. माझ्यात तेवढी संवेदन शिल्लक आहे . त्यांच्या
भावना समजू शकते मी.. बाकींच्यासाठी डोके, भावना वापरणे व्यवस्थेत बसत नाही.
म्हणजे गरजच भासत नाही. निसर्गावर मात करण्यासाठीच माणसाने सगळे नैसर्गिक डोके
वापरले.. जणू तो शत्रूच. त्याने एका फटक्यात पानिपतच केले. इतका मोठा धक्का होता
कि परत म्हणून निसर्गाविरुद्ध वागण्याची हिम्मत झाली नाही त्याची. मग काय डोक्याचा
वापर कमी झाला. तसेही ते सगळे वापरले जातच नव्हते. आता तितकीही गरज पडत नाही.
ठरवलेच तर वापरता येते, मी नाही का वापरत. प्रथमाला पर्याय नसतो त्याशिवाय, नाहीतर
व्यवस्था कोण चालवणार ?अर्थात जे कमी होते त्याची जागा काहीतरी घेतेच. आम्हा
सगळ्यांना सहावे इंद्रिय असल्यासारखे आहे. धोका ओळखतो आम्ही लांबूनच. कुणी संकटात
असले तर आम्ही लगेच एकोप्याने धावून जातो. आत्ता शस्त्रे नाहीत हातात मग एकोपाच
कामी येतो.
सकाळी उठल्यावर
स्मृती कोशिका मध्ये डोकवायचे असा माझा परिपाठ आहे.आणि असे स्वतःशी बोलण्याचाही. इतिहास कसा घट्ट आहे डोक्यात सगळ्यांच्या.
स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या डोक्यात जसे कुठे अन कसे जायचे बसलेले असते तसे.
जगणे आणि वंश वाढवणे. त्यासाठी पक्की व्यवस्था कायम ठेवणे किती आवश्यक आहे हे त्या
काळोख्या इतिहासात पुरेपूर भरलेय. खोखो हसते कधी कधी मी एकटीच, पैसे काय..
अर्थशास्त्र काय.. देश काय... शस्त्रे काय .. महासत्ता काय.. कारखाने काय ...
यंत्र काय.. यंत्रमानव काय सगळेच विनोद.
जे कृत्रिम ते चांगले म्हणे. जो सगळ्यात जास्त उर्जा वापरतो तो प्रगत म्हणे..
मिळाले काय प्रदूषण, नैसर्गिक साधनांची लुट. स्वतः संपले, सगळे संपवले.
त्यांच्यासाठी वापरायचेअपशब्दही संपलेत. अति झाले अन हसू आले. कधी कधी अक्षरशः
हसून पोट दुखते. उच्च नीच, जात, रंगाचे भेदभाव, त्यापेक्षा मजा म्हणजे स्त्री
पुरुष भेदभाव. आता या म्हणावे बघायला या ‘पुरुषांची’ स्थिती. आम्ही जगू तर जगतील
नाहीतर.. ज्या लिंगभेदावर त्यांनी डोलारा उभारला त्याचा वापर सुद्धा करायला मिळेलच
असे नाही. जगण्याला तसा काही मतलबच नाही. पुरुषार्थ म्हणे .. हा हा हा हा.. हसणे थांबवायला पाहिजे नाहीतर मानसिक संतुलन ढळलेली प्रथमा निरुपयोगी
म्हणून मलाच बाहेर पडायला लागायचे.
व्यवस्थेला बाधा येईल असे काहीही चालवून घेत
नाही इथे. मग चालते काय ? अर्थात फक्त व्यवस्था.२६०० साली तीच होती,२८०० साली तीच
होती. आत्ताही तीच आहे. मोठ्या मुश्किलीने तग धरलाय मानव जातिने. व्यक्ती
स्वात्यंत्र वगैरे बाता आता इतिहास जमा झाल्यात. समूहात राहा. समूहा बाहेर टाकले
गेलात तर जगण्याची शाश्वती नाही. म्हणजे तेच अंतिम प्राक्तन असते इथे. तुमची
उपयुक्तता संपली कि बाहेर पडायचे नाहीतर बाहेर काढले जाते. वेळ येतेच मग .. निसर्ग
आहे तो स्वीकारायचा. तो आधीच व्यवस्थित स्वीकारला असता तर ..तिचा संबंध आला नसता. भल्या मोठ्या पोळ्यातली ती राणी माशी हसत असते
जणू. तिचे जाडगेले पोट अंडी घालताना थुलथुलते. तिचा तिरस्कार वाटतो.. पण सुटका
नाही.तिने ते गुळचट उग्र वासाचे खाद्य घेतले. तेच ते ‘शाही’ खाद्य तिने घेतले कसले तिला भरवले तिच्या सेवेतल्या कामकरी
माशीने. आता तिथेच ती घाण करेल. साफ करेल सेवेतली माशी. तिचे काम एकच खा, घाल अंडी
पुन्हा खा पुन्हा घाल अंडी २०००-३०००. हीच ठरविणार नर कोण. मादी कोण. तिचा तो
दासींनी भरलेला महाल, त्या राणी साठी खास खाद्य बनवतात आयुष्यभर तेच खायचे
तिने.तिला तरी काय म्हणायचे बिचारीला. कधी तरुण असताना अठवडाभर उडाली असेल काय ते.
तेव्हाच तिचे नर तिला भेटले. जणू मृत्यूला भेटले.. मेले, ही जगली. फार जगते बाकीच्यांपेक्षा. सगळ्यांना मारून जगते. या
दासी ,पोरीच तिच्या . तिनेच त्याना दासी बनायलाच जन्माला घातले. नवीन राणी होण्यासाठी खास अळीला तेच ते महान .. शाही खाद्य
घालतात तिच्या पोरी. आपल्यातल्या एकीला मोठे करतात राणी बनायला .ही तिलाही हाकलून
देईल. एका पोळ्यात दोन राण्या शक्यच नाही. ती नवीन राणी होऊ शकणारीही कोशातून
बाहेर येताना प्रतीस्पर्धी कोणी असेल तिला कोशातच किंवा बाहेर येताच मारून टाकते.
ही राणी थंड डोळ्यांनी बघते, हिचे सरंक्षण दासी करतात. मग ती नवीन राणी आपल्या
त्या विजय्ध्वनीने सगळ्या कामकरीना अंकित
करून जुन्या राणीला मारून पोळे ताब्यात घेते, नाहीतर नवी वसती करायला बाहेर पडते.
असे एक भले मोठे पोळे इथे प्रत्येक भल्या मोठ्या घरा बाहेर असतेच. या
लाकूड, डिंक, मेण, कापसाने बांधलेल्या अगदी देखण्या वसाहत वजा घरा पुढे ते विद्रूप
दिसते. आणि प्रत्येक पोळ्यात ती असतेच ती नसेल तर लगेच ते पोळे उध्वस्त होईल. तिचे
अस्तित्व हे त्या कामकरींसाठी महत्वाचे आणि आमच्यासाठीही ..तिला हे माहिती आहे . म्हणूनच ती हसते आहे. प्रत्येक
वसाहतीच्या प्रथमाला हा ताण आहे कि समजा उद्या जर तिचे आत्ताचे हे नुसते हसण्याचे
भास, खरोखरचे हसणे झाले तर ..
या विचारा सरशी माझ्या कक्षाला लागून असलेल्या कक्षाकडे लक्ष जातेच. तीच
आमच्या वसाहतीची सर्वेसर्वा.जसे तिथे तसे अन तेच इथे. तिथे प्रथमा नसते आणि कुणाला
डोके नसते त्यामुळे मला होणारा त्रासही कुणाला होत नाही असो ,फार वेळ गेला तिची
सकाळची हालहवाल बघायलाच पाहिजेच आहे.. दारातूनच डोकावले. तीच तिरस्काराची भावना
दाटून आली. पूर्वी म्हणे ‘आई – मुलं’ असे काही तरी महान नाते होते. आता ..हं .. म्हणे
आई.
अवाढव्य पोसलेली रंगीबेरंगी कपड्यातली ती
पसरलीय. तीच्या मुली तिच्या दासी तिच्यापुढे वाळक्या चिपाडासारख्या दिसतात मी ही
तशीच . पांढर्या झग्यातल्या आम्ही, हे रंगहीन झगे नाही घातले काही तरी कोण बघणार
आहे? आमच्याकडे बघावे असे काही नाही अन बघणारेही कुणी नाही. तिच्याकडे बघवत
नव्हते पण तिला नटवले जाते. तिच तर वंश चालवते जुळी, तिळी जन्माला घालते. आमच्या
जगाण्याचा आधार. तिच्यामुळेच काम असते. तिला जगवण्याचे, साफ ठेवण्याचे काम. तिने
जन्माला घातलेली मुले सांभाळण्याचे, वसाहत साफ ठेवण्याचे, अन्नसाठा करण्याचे,
रक्षणाचे काम, मला व्यवस्थापनाचे काम . काम आहे म्हणून जगतो. काम संपले कि आयुष्य
संपले. नुसते कर्तव्यच. नाही तर जिवन पुढे कसे चालणार? केव्हढी क्रूरता. काय पाप
झाले? कोणी केले ? भोगतय कोण ?प्रश्न रोज पडतात. मेंदूत नाचतात. माणूस आहे मी. फार
जुनी गोष्ट झाली ती. सध्या तरी किटकाचे जिणे जगल्यासारखे वाटते.
कशाला नुसते जगण्याचा हा पर्याय स्वीकारला त्यावेळी ? त्यापेक्षा मानव
जात नष्ट होऊन नवीन काही उत्क्रांती झाली असती तर बरे झाले असते. काय तर म्हणे
मधमाश्यांचे ते शाही खाद्य एकाच स्त्रीने आयुष्यभर खायचे आणि स्वतःला पोसवायचे.
त्या खाद्यातली प्रथिने स्त्रीबीजे पक्व करतात, तिची प्रजनन क्षमता वाढवतात.
आयुष्य वाढवतात. राणी बनवतात. त्यातही ते अन्न एखादिलाच उपोयोगी पडणार. सगळ्या
लहान मुलीना सुरुवातीला द्यायचे. जिला उपोयोग होतो ती भराभरा वाढायला लागते. तिला
बाजूला काढायचे. तिला ते खाद्य आयुष्यभर द्यायचे. ती पुढची जन्मदात्री. बाकीच्या
..’आम्ही’. गेली ५०० वर्षे तरी हेच जिणे चालू आहे. मोठ्या नाजूक संतूलनावर तोलले
आहे सगळे.
शाही खाद्याचे हे गुण माहित होते आधीपासून पण त्याच्यावर संपूर्ण मानव
जातीचे भविष्य अवलंबून राहील असे वाटले नव्हते. पूर्वी मधासाठी मधमाश्यांच्या
कृत्रिम वसाहती पाळायचे. आता जणू त्याच आमचे जीवन पाळतात असे वाटते. ह्यालाच
म्हणायचे निसर्गाचा न्याय. जितके माणसाने इतर प्राणीमात्राना वेठीस धरले तितकेच तो
आता वेठीस धरल्या सारखा आहे, मिंधा आहे त्याकाळातल्या नुसार यःकश्चीत असलेल्या मधमाश्या
सारख्या क्षुद्र कीटकांचा. आता खरे क्षुद्र कोण हा प्रश्नच आहे. समजा चुकून
निसर्गाला इतकीही शिक्षा पुरेशी नाही वाटली आणि त्याने त्या शाही खाद्याचे स्वरूपच
बदलले. त्यातली प्रथिने स्त्रीबिजावर काम करेनाशी झाली आणि परत माणूस जात नष्ट
होण्याच्या मार्गाला लागली तर?? हेच तर ताणाचे कारण आहे सगळ्या प्रथमांच्या.
त्यासाठीच असे वाटते कि ती राणी माशी हसते आहे खदाखदा, या ‘महान’ मानव जातीला.
त्याच्या प्रतिनिधी असलेल्या ‘आम्हाला’. ‘आम्ही’ .. प्रथमा असल्याने जरा तरी डोके चालवल्याने माणूस असल्या
सारखे वाटते. बाकीच्या नुसत्या आकड्यांच्या धनी . कोण त्यांचे प्रेमाने नाव
ठेवणार? मुळात प्रेम करणार कोण? माझाच जीव तुटतो. त्यांना तरी काय माहिती प्रेम
वगैरे. त्यांना फक्त आपल्या जगण्याचे पडलेय. त्यासाठी कामाचे पडलेय. माझेही काम
करायचेय मला. मुलीना कामाला लावायचे. थोड्या आहेत का त्या? २००-२५० तरी असतील. १००
च्या जवळ पोहोचली आई आणि तीच्या जुळ्या तिळ्या आम्ही पोरी. त्यामुळे एवढ्यांचा
गाडा चालवायचा.
चला रोजची फेरी व्हायला पाहिजे होती एव्हाना.
राणी आणि माझा सगळ्यात
वरचा मजला. याच्या खालच्या मजल्यापासून सुरुवात करावी. त्या मजल्यावरचे सगळ्यात
मोठे एकच एक अवाढव्य दालन बाळांचे. वेगवेगळ्या वयातल्या बाळांना तिथे ठेवलय. मोठी
गोंडस असतात. त्यांना पुढचे भोग माहिती नसतात, सारखीच असतात, हसतात, खेळतात. थोड्या
मोठ्या झालेल्या दीदी त्यांना सांभाळत असतात.त्या उत्साही असतात, खाऊ घालतात. कपडे
बदलतात. बाळाशी खेळतात. जरा आवाज चढवून बोलले कि घाबरगुंडी उडते त्यांची. मला
बघायला मजा वाटते. तश्या निरागस असतात बिचार्या . त्यांना काय माहित मीही
त्यांच्यासारखीच. उगाच हवा करते. तेव्हढीच मजा या रसहीन वातावरणात
’कामाला लागा मुलीनो. १९२
खाऊ घातलास का त्या बाळांना?’
‘ हो, हो प्रथमा , म मला ही नवीनच जन्माला आलेली २४९ आजारी वाटली .
तिला झाडपाल्याचे चाटण दिले.’
’ तंतारायला काय झाले? मी काय
खाते का? वाटेल बरे तिचे तिलाच. खाण्या पिण्यावर लक्ष ठेवा. आपल्याकडे स्वतःला
जगवणारेच जगू शकतात . कृत्रिम रितीने जगवायचे नसतेच. तेंव्हा त्या पद्धतीने काळजी
फक्त घ्या .’
‘हो. हो प्रथमा’ ती घाबरतच म्हणाली.
जाऊ दे पुष्कळ पिडले बिचार्यांना.
त्याच्या खालच्या मजल्यावर जावे. या मजल्यावर सगळ्या जणी राहतात छोट्या छोट्या कक्षातून.
बर्याचशा अन्नासाठा करायला जातात. तोही जरुरी पुरताच. आम्हाला कुठे काही विकून
पैसे करायचेत, ही ही ही..असे हसण्याची उबळ येते मध्येच काही आठवले की .. तर
पुढच्या मुली
‘ ८८ तुझ्या बरोबरच्या इतर जणींना घे आणि अन्नाची व्यवस्था बघा.
शेतीचा जमाना विसरला माहितेय ना ? बाहेर जंगल वाट बघतेय. जा हात चालवा. पाऊस जवळ
येतोय. अन्न साठा बघा.’
‘हो प्रथमा. साठा करायला सुरुवात झालीय.’
‘हे सगळ्यात महत्वाचे.चला लागा आपापल्या कामाला’.
त्याच्या खालच्या मजल्यावर जाताना का कुणास ठाऊक मला थोडी हुरहूर
वाटते. खरे तर काहीच कारण नाही. सगळे ‘पुरुष’ या मजल्यावर राहतात, आहे ते इथेच
जन्माला आलेले, ज्यांना बाहेर राणी मिळाली नाही किंवा शोधायची संधी यायची आहे असे.
त्यांचे काही नाही. खरेतर कोणाचेच काही नाही. असून काही उपयोग नाही. पण.. शरीर असे
वांझ असले तरी मन .. त्याचे काय ? आणि ते मलाच आहे. तिथल्या इतरांना नाही. ते राणी
बरोबर आलेले. तिला आवडलेले. तगडे तरुण. राणीने त्यांना पसंद केले. त्यांचे जीवन
सार्थकी लागले. काही काळ जगण्याचा अधिकार मिळाला. नाहीतर कधीही बाहेर काढले जायची
टांगती तलवार घेऊन राहावे लागले असते.
पण त्यातला एक वेगळा आहे. त्याच्या कक्षा वरून जाताना धड धड होते
काळजात . तो आदराने बघतो. कधी वेगळीच भावना दिसते त्याच्या डोळ्यात. नुसते
डोळ्याला डोळे भिडले तरी माझा चेहरा बदलत असावा. मला एकदम जाणीव होते कि शरीर
पुरेसे भरलेले नसले तरी माझा चेहरा देखणा आहे. जो त्याक्षणी आरक्त झालेला आहे. विशेषतः
त्याचे डोळे बुद्धिमान वाटतात, ते समोरच्याची बुद्धी ओळखू शकतात. त्याला मनही समजत
असेल? त्याचेही सहावे इंद्रिय माझ्यासारखे तरल होते का? त्या कल्पनेने कसा अलवार
होऊन जातो तो क्षण. मी सगळे विसरते. जबाबदारी, ताण, विफल आयुष्य, सगळे धुक्यासारखे
विरून जाते. असे वाटते तो असाच माझ्या कडे बघत राहावा अन मी त्याच्याकडे,.
त्याक्षणी संपून जावे सगळे. अर्थात असे होत नाही. मी पुढे जाते. तो त्या निर्बुद्ध
राणीने निवडलेला ‘पुरुष’ आहे. त्याला त्याचे भोग आहेत आणि मला माझे.
स्त्रीचे मन
परत गुंडाळून ठेवले जाते आणि व्यवस्थापिका प्रथमा आपली जागा घेते.
‘१२९ सगळे ठीक आहे ना? राणीकडे जायचा दिवस आहेआज. जाणारा आरोग्यपूर्ण
असेल असे बघ. कुणी आजारी असेल तर सरळ बाहेर काढ. आपल्या अन्नासाठ्यावर अवाजवी ताण
नाही ना पडत यांचा?’
‘ सगळे ठीक आहे प्रथमा. काही वाटलेच तर सांगते. आज याची पाळी आहे .’
तिने त्याच्याच दिशेने केलेला हाताचा निर्देश बघून मनात कळ आली आणि
डोळ्यात आले त्याला बहुतेक पाणी म्हणत असावेत. पहिल्यांदाच ते आले. त्याच्या
व्यतिरिक्त कुणाला ते म्हणजे काय ते कळले नाही. त्यामुळे त्यांना ते पाणी दिसले
तरी फरक पडत नव्हता.
‘ कसला कचरा आहे इथे १२९. डोळ्यात काहीतरी गेले बघ माझ्या डोळ्यात.’
एव्हढे म्हणून भागले.
क्षमा असावी प्रथमा, इथे कचरा कसा काय? आख्खी वसाहत अगदी स्वच्छ असते.
मला काही समजत नाही. पण मी परत सफाई करून घेते.’
‘ ठीक आहे १४५ च्या अखत्यारीत
आहे ना सफाई ? तिला म्हणावे मुली काय टिवल्या बावल्या करतात का बघ.’ उगाच डाफरून
रूद्ध मनाला सावरायची संधी दिली. आणि एकच कटाक्ष त्याच्याकडे टाकून चटकन बाहेर
पडले. त्याच्याही नजरेत अनोळखी ओळखीचे बरेच काही होते आणि माझ्याही. आता हलणे भाग
होते. शरीराने त्यापेक्षा मनाने.
इथून पुढे खाली जायचे म्हणजे पुढची तजवीज करायची. या सगळ्या भागाला
विशेष महत्व आहे. इथे भावी राणी तयार होत होती. अगदी सुंदर, शेलाट्या कमानदार
बांध्याची. बघताच जीव खुळा व्हावा वरच्या मजल्यावरच्या एखाद्याचा. हीसुद्धा पुढे
अशी बेढब ढोली होणार आहे. आता मात्र तिचे नखरे अगदी अफलातून. तिला छान सजवले आहे.
‘काय २०० राणी व्हायला अगदी
सज्ज आहेस’
‘इ ... प्रथमा २०० वगैरे काय राणीच आहे मी. राणी म्हण
मला तुझ्यासारखीला काय समजणार म्हणा राणी म्हणजे काय असते ते’
बघा एवढे झटके बसले तरी मानव
वैशिष्ट्य असलेला हा अहंकार आहेच हिला. मी काय बोलणार हिला? असू दे भावी राणीला
हेही ‘गुण’ पाहिजेच. मी सरळ पाठ फिरवून बाहेर पडले. तिथल्या सेविकेशी बोलायला
लागले.
’७४ मला सांग. ही तयार आहे ना?’
‘ हो प्रथमा. म्हणशील तेव्हा
बाहेर पाठवू शकतो. ५० जणी बरोबर देऊ तिच्या नवी वसाहत करू शकतील अशा . ’
‘नको. माझ्या मनात वेगळाच विचार
आहे’
मी परत वर गेले.जाता जाता थोडे खाल्ले. वरती अन्नाच्या मजल्यावर
सगळ्या मजा करत होत्या. मुली नाचत होत्या. काही गात होत्या. यांना काही चिंता
वगैरे नसते. आजचा दिवस आनंदात जगतात. मी ही त्यांच्या आनंदात सामील झाले. फार काळ
रमता येत नाही. वर जाणे भाग आहे. एक महत्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे. एकदम वरचा
मजला गाठला. राणीच्या कक्षात जाताना रक्षकाचे काम करणाऱ्या ५, ७, १५, २८ , २५ ज्या
तिथे दिसल्या त्यांना आवाज दिला. आम्ही सगळ्या मिळून तिच्या समोर उभ्या राहिलो. ती
दचकलीच. तिच्या सहाव्या इंद्रियाने धोक्याचा संदेश दिला बहुतेक.
ती एकदम आक्रमक
पवित्र्यात समोर उभी राहिली.
‘काय ग प्रथमा तुम्हा सगळ्यांना उद्योग नाही का? चालत्या व्हा सगळ्या.
मला आराम करू द्या. राणीचा हुकुम आहे हा. नाही तर..’
‘नाहीतर काय राणी? तुला सगळे माहिती आहे,आम्ही इथे का उभ्या आहोत.
तुझे सहकार्य अपेक्षित आहे.’
‘ हो माहित आहे. ती दुसरी तयार झालीय ना आता. आईच्या मुळावर उठली.
तिला तुम्ही बाहेर पाठवणार होता ना? थांब या माझ्या पोरी पाठवून तिला मारूनच
टाकते. राणीसाठी तेव्हढे करतीलच त्या. अग फक्त गेल्याच वेळी मी एक मुल जन्माला
घातले .काय करणार ? जागाच नाही इथे. तिला बाहेर काढा. तिच्याबरोबर अजून काही जणी
पाठवा. इथे जागा करा. मग अपोआप तिळी होतील. मी २५० वेळा प्रसवले.अजून प्रसवीन मी.
प्रथमा तुही माझीच ना? प्रत्येकवेळी त्या क्षुद्र कीटकांच्यासारखेच वागायचे का
आपण?माणसासारखे वागायचे नाहीच का?’
‘तूला कळतंय पण वळत नाही राणी. हेच असाच चालले आहे. ज्या मनुष्यत्वाची
तू आता आठवण करून देत आहे. ते असते तर तू आईचे प्रेम दिले असतेस आम्हाला. दासी
सारखे वागवले नसते. त्यामुळे वास्तवाला सामोरी जा. वंश सातत्य राखण्याचे काम आहे
तुझे आणि तो वंश आरोग्यपूर्ण असावा हे बघणे हे माझे काम. मागच्या वेळच्या
तीळ्यातली एक अपंग निपजली. त्या आधीच्या जुळ्यातली एक जन्मतःच मेली. अलीकडच्या
बऱ्याच जन्मलेल्या आजारीच असतात. हे असं चालणार नाही .’
‘दुष्ट आहात तुम्ही सगळे, तेही दुष्टच होते. मला असे बनवले. फक्त जन्म
देणारे यंत्रच जणू.खरी यंत्र बनवणे बंद केले. म्हणून खरी माणसेच यंत्र बनवली. आता
माझा वापर झाला, तर द्या फेकून. ’
‘ आम्हालाही त्याच मार्गाने जायचं आहे. आधीचे सगळेही निसर्गाविरुद्ध
युद्ध करण्याच्या बाता मारून त्याच मार्गाने गेले. हे सगळे आम्ही केले नाही.
नैसर्गिक संक्रमण होण्याच्या मार्गावरचा तो एक टप्पा होता. होईल बदल हळूहळू . तरी
आमच्यापेक्षा जास्तच जगलीस तू . मोह सोड आता. सहज होऊ दे सगळे . तेव्हढे तरी
माणूसपण टिकव. कीटक खूप क्रूर असतात ग.’
एका दिवसात दुसर्यांदा अश्रू येऊ नये
यासाठी आटोकाट प्रयत्न करायला लागला मला. गेली ती काहीही न बोलता. काहीतरी
कालवाकालव झाली हृदयात. माणूसपण शिल्लक असल्याच्या खुणा दिसतात अधून मधून.
’२५ तुला पुढे काय करायचे माहित आहे. म्हणजे ती स्वतःच ठरवेल. राहते
म्हणाली तर राहू दे. राहील एका कोपर्यात. ती काही जड नाही. तिचा विषय संपलाय.’
झटकन वळून आधीच्या राणीच्या सेवेतल्या मुलीना धक्यातून बाहेर काढले पाहिजे. नाही
तर उगाच त्या नवीन राणीच्या सेवेत कुचराई करायच्या . स्वामी बदलला तरीसुद्धा सेवा
करणार्याना त्रास होतो. ’४२ आता नवीन राणी येते आहे. तिच्यासाठी जागा साफ करा. नवी
सजावट करा. तिला नटवून इतमामाने घेऊन या. सगळ्यांना नवीन राणी आलीय हे कळले
पाहिजे.तिला बाहेर जाऊ दे. मोकळे मनासारखे जगू दे. तिच्या आवडीचे पुरुष शोधेलच ती.
तिच्या सगळ्या गरजा पुरवा. चांगला वंश देईल ती’. नशीबवान आहे ती.
आता मला माझ्या जागी कुणीतरी शोधायला पाहिजे. सगळे समजून सुद्धा
डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. मोठे अवघड काम आहे. सगळ्यात राहून असे लिप्त
अलिप्त राहणे कसरतीचे आहे. राणी ला जो नियम तोच प्रथमाला लागू. नवीन राणी नवीन
प्रथमा. तश्या एक दोन जणी हेरून ठेवल्यात. हुशार आहेत. बुद्धी, सहावे इंद्रिय सगळे
तल्लख आहे. त्यातली एक तर मला विशेष प्रिय आहे. तिच्याशी बोलताना मला आनंदाचे भरते
येते. एकदम खालच्या मजल्यावर जायला हवे तिच्यासाठी. जाता जाता सुरक्षा रक्षकांशी
सुद्धा बोलायला पाहिजे. त्याच मजल्यावर आहेत त्या.
‘ २ तुझ्या हाताखाली पुरेश्या रक्षक आहेत ना? राणी बदलत आहे सगळे सुरळीत
व्हायला पाहिजे. कुठेही काही गोंधळ व्हायला नको. जुनी राणी इथेच राहील कादाचीत.
इथेच तुमच्या मजल्यावर शेवटच्या कक्षात ठेवा. लक्ष असू दे.’
‘ हो जी जबाबदारी द्याल ती पार पाडली जाईल प्रथमा.’
मग माझे अतिशय प्रिय काम. तो कक्ष अतिशय सुंदर होता. खिडकीतून छान फुललेली
सायलीची वेल होती. त्या फुलांचा सुगंध प्रफुल्लीत करत होता. सगळ्याच गोष्टी बदलत
नाहीत. ही किती आश्वासक गोष्ट आहे. तीच फुले तोच सुगंध, तोच आनंद शतकानु शतके.
मुलीने तो कक्ष किती छान सजवला आहे. बाहेरची फुले आणून रचना केल्यात. साफ बिछाना.
सगळ्यात सुंदर तिचा सायली सारखा हसरा चेहरा, वेगळ्याच जगात नेणारा. सगळे व्याप ताप
विसरायलाच जणू तिची नेमणूक आहे. साया, मी तिला नाव दिलेय. किती शतकांनी एका मुलीला
नाव मिळाले. ‘साया, कशी आहेस बाळ?’ ती एकदम येऊन गळ्यात पडली. प्रेम, वात्सल्य
म्हणून जी काही संवेदना असते. ती मनाला व्यापून राहिली. अशी ही एकटीच. माझे, तिचे
भाव बंध कधी निर्माण झाले ते कळलेच नाही. इतरांना वाटत होते मी तिला प्रथमा
बनण्याचे धडे देते आहे. इतकी वर्ष तिच्या जन्मा पासून ती माझ्या संन्निध आहे.पहिल्यांदा
मी तिला बघितले इतकी गोड हसली ती की माझ्या आतून आतून काही उमाळे फुटल्यासारखे
वाटले. मग ती माझीच झाली. दिवसभरात फक्त तिच्या सहवासातला काळ फक्त मला जागल्या
सारखे वाटते. लहान पंचे तिच्या बाळ लीला, बोबडे बोल. फक्त एकदाच मी तिला ‘आई’ म्हणायला
लावले होते. अंगावर रोमांच आले तिच्या मुखातून तो शब्द बाहेर पडताच. माझी साया ..
तिचे खाणे पिणे माझ्या
देखरेखी खाली झाले. अगदी साधा सात्विक आहार दिला. ते शाही अन्न चुकून सुद्धा तिच्या
पोटात जाऊ दिले नाही. या सगळ्या काळजीने ती छान बाळसेदार झाली होती. कुणाच्या
नजरेवर ते येऊन पुन्हा राणी बनण्याच्या ‘महान’ प्रक्रियेत ती अडकू नये म्हणून
घोळदार कपडे घालायचे तिला. पण अखेर तो दिवस आला माझी साया एका देखण्या तरुणी मध्ये
परावर्तीत होत होती. माझ्या मनात एक आस होती. पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत
असलेली आस. त्यांनी नुसती इच्छा धरली मी तसे प्रयत्न केले. सगळे शाप उःशापात
बदलण्याची ही इच्छा कि स्त्री नैसर्गिक रित्या परिपूर्ण व्हावी. होईल असे? पूर्वी
होता तो देवाचा आधार ही आता नसतो. खूप वास्ताव वादी आहे सगळे. निसर्गैच्छा बलीयसी.
आणि तिने सांगितले ते . जे ऐकायला कान तरसले होते.
‘ प्रथमा आज काही वेगळे झाले. स्मृती कोशिकामध्ये कळले मला. मी आज
पूर्ण स्त्री झाले. तुला सांगायला मी उतावीळ झाले होते.’ आणि ती चक्क लाजली. तेच
म्हणतात त्या विभ्रमाला. मला आनंदाचे भरते आले. अखेर निसर्ग प्रसन्ना झाला तर.
‘ साया जिंकलेस पोरी. माझा जन्म सार्थकी लागला, नव्हे मनुष्यजातीची
इतक्या शतकाची तपश्चर्या सफल झाली. तुझ्या वर आता मोठीच जबाबदारी आहे मुली. एका
वळणावर आपण उभे आहोत इथून पुढची वाटचाल आता तुझी आहे. योग्य मार्ग निवड आणि मानव जातीला
चांगल्या मार्गावर पुढे ने. दुर्गुण त्यागून तावून सुलाखून निघालीय अखिल मानव
जात.तुझ्या रूपाने पुन्हा एक नवे पर्व सुरु होते आहे. आता बाहेर पड. तू अगदी
सुयोग्य जोडीदार निवड. बुद्धिमान, शूर असा आणि दूर कुठेतरी आपले जग वसवा. माणसांचे
जग , कीटकांचे नाही.’
‘म्हणजे तू येणार नाही ? मला एकटीला नाही जायचे. तू पण चल.’
‘जा साया. नवीन राणीचे काही फतवे जरी व्हायच्या आत बाहेर पड .’ हे म्हणताना दोघी रडत होतो. आनंदाने आणि
दुखाणेही.पूर्वी मुली सासरी जाताना असेच काही होत असेल. आणि साया गेली नव्या
जगाच्या दिशा शोधत, नाही नवे जग तयार करत... कारण तिची दिशाच वेगळी आहे.
-
डॉ सुनीता बागवडे, १३६९ कसबा पेठ, पुणे ११, मोबा.
९७६७५५७३५६