फकीरी सोंगटीचे रहस्य
डॉ. मंदार अक्कलकोटकर
प्रो. बद्रीनाथ आज
खूपच आनंदात होते. स्वत: च्या हाताने शाडू मातीची ओबडधोबड मूर्ती केल्यावर
लहान मुलाला जसा आनंद होतो तसाच काहीसा निखळ आनंद प्रो. बद्रीनाथ यांना
झाल्यासारखे वाटत होते. त्याचे कारण त्यांची लाडकी लेक सुलक्षणा व हरहुन्नरी तरुण
सहकारी कमलेश यांनाच फक्त माहिती होते. पत्नी राधाबाई या
प्रो. बद्रीनाथांच्या शास्त्रीय प्रयोगांपासून जरा दोन हात लांबच राहायच्या. प्रो.
बद्रीनाथांच्या प्रयोगशाळेकडे म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीकडे
फिरकत देखील नसत आणि प्रो. बद्रीनाथांच्या विविध प्रयोगांकडे थोडक्यांत नसत्या
उचापत्यांकडे लक्ष वेधल्यास हे नादीष्ट आहेत इतकेच म्हणून हसून विषय बंद करत.
खरेतर राधाबाई या
प्रो. बद्रीनाथांच्या अगदी सुरुवातीच्या लेक्चररच्या नोकरीच्या काळातल्या एक
विद्यार्थिनी होत. स्वत: वर सतत प्रयोग करणा-या बद्रीनाथांना जेवणाच्या खाणावळीचा डबा द्यायला
तळेगांवसारख्या आडगावांत कोणी तयार नसे. कारण अन्न वैविध्याचे उपक्रम छांदिष्ट
म्हणून सतत करणा-या या वेड्याच म्हणावे अशा मास्तरला एक महिना बिनमिठाचे तर दुसरा
महिना बिनतेलाचे जेवण डब्यांत कोण देणार ? कधी फक्त उकडलेल्या भाज्या तर कधी फक्त कच्च्या
कापलेल्या भाज्या. कधी आदीवासी खातांत त्या चिणा, सावा, कोद्रू, हारीक इ. क्षुद्रधान्यांची
उकडलेली खिचडी तर कधी लोखंडाच्या कढईतील नाचणी, बाजरी चे उप्पीट. नाना त-हा.
सख्ख्या नात्याचे कोणी नव्हतेंच. पण असते तरी अशा अजब आणि रोज वेगळ्याच बेचव जेवण
जेवणा-यापेक्षाही त्याला तयार करणा-या स्वयंपाकी बाई किंवा माणसाला मानसिक त्रासच
व्हायचा.
पण नियतीची इच्छा ही
काही वेगळीच असते आणि अशा वेड्यांना सांभाळणारी माणसेही जन्माला आसपासच कुठेतरी आलेलीच
असतांत. तर प्रोफेसरीण बाई म्हणजे आपल्या नायकाच्या पत्नी राधाबाईंची आई
सुनेत्राताई म्हणजेच आपल्या प्रो. बद्रीनाथांची सासू ही अशीच सोशिक बाई. माहेरी
नातेवाईकांच्या गोतावळ्यांतील मोठ्या घरांत वाढलेल्या. त्यांचे सासरेही प्रख्यांत
वैद्य आणि त्यांची पथ्येही तशीच कडक. एखाद्या रुग्णांला हटकेच रागावून दही किंवा मिठाचा
वास जरी घेतलांस तरी औषध देणार नाही असा दम द्यायचे. अशा घरांतल्या थोरल्या सुनबाई
असणा-या सुनेत्रा ताईंना त्यामुळे प्रो. बद्रीनाथांच्या विचित्र जेवणाच्या सवयींचे
विशेष असे ओझे कधी वाटलेच नाही.
भव्य कपाळाचा, गोरा
पान, भारदस्त कमावलेले शरीर असणारा उंचापुरा हा तरुण शिक्षक विद्यार्थी प्रिय
असल्याचे त्यांना कळलेच होते. बिन इस्त्रीचे साधे सुती स्वच्छ पांढरे कपडे
घालणारा, खाली मान घालून चालणारा, टिंगल टवाळीच्या वा-यालाही न थांबणारा आणि सतत
हातांत काहीतरी झाडेझुडे, मुळे, प्राणी, कागदांच्या पिशव्या नेणारा सतत कामांत आणि
विचारांत व्यग्र असणारा तरुण त्यांच्या मनांत कधी कालवाकालव ही करायचा.
अचानकपणे लहानपणी
वारलेला सख्खा एकुलता एक भाऊ आज जिवंत असता तर असाच दिसला असता असे सतत त्यांच्या
मनांत उगाचच येवून जायचे. मग बहीणीचेच मन ते, हळूच एखादा टिपका डोळ्यांतुन काढायचा
व गुपचुप पदराने पुसून टाकायचा. तर थोडक्यांत शास्त्राच्या विचारांत डुंबलेल्या
मास्तरांमधे आपल्या सुनेत्राताई ही गुंतत चालल्या होत्या.
महाविद्यालयाच्या
रस्त्यावरच वाटेवर सुनेत्राताईंचे भले थोरले घर, मोठे अंगण, सावलीची पडवी असलेल्या
घरांत इनमिन तीनच लोक राहायचे. त्यांत राधाबाईंच्या वडिलांची म्हणजे अनंतरावांची
शासकीय फिरतीची नोकरी. मग दीर्घोद्योगी सुनेत्राताई आसपासच्या पोटुशा मुली,
बाळंतीणी, त्यांची गोंडस चिल्लीपिल्ली, आजारी आजी आजोबा, मुले यांची ख्याली खुशाली
स्वत: हून
विचारायच्या. वेगवेगळे पाचक, मुरंबे, पाक, कल्प बनवायच्या. साजूक तुपातले पौष्टिक
पदार्थ बनवून नाममात्र शुल्कांत द्यायच्या. बाजारातल्या वनस्पती तुपातल्या
पदार्थांपेक्षा त्यांचे लोणकढ्या साजूक तुपातले पदार्थ स्वस्तच असायचे. त्यांना
यातले अर्थशास्त्र विचारले तर म्हणायच्या यामुळे घरांतले तूप संपते तरी. नाहीतरी
पुराणघृताने तांब्याचे किती तांबे भरून ठेवू. आता हे म्हणजे काय असे वाचक विचारतील.
तर पुराणघृत म्हणजे त्यांच्या सास-यांचा हातखंडा मलमाचा सोपा नमुना होता. कोणतीही
जुनी व खराब जखम असो, गांवातले लोक या तुपाच्याच जिवावर जखमांतुन बरे व्हायचे. शिळ्या
साजूक तुपाचे तांब्याचे लोटे फडताळावर फडकी बांधून वर्षानुवर्ष पडलेले असायचे.
शिवरायांच्या किल्यांवर म्हणे अशा पुराण घृताचे रांजण भरलेले असायचे. घाव
भरण्यासाठी फक्त तूप लावायचे. मग जखमेत पू होत नाही आणि जखमेचा डागही राहांत नाही.
आजही घरी खाटेवर पडून असणा-या जुनाट बेड सोअर्स च्या जखमांना, भाजलेल्या,
कापलेल्या जागी हे सोपे मलम वापरले तरी आराम पडतो. तर असो पुराण घृताचे पुराण पुरे करु कारण ते आपल्या
मूळ विषयाकडून आपल्याला दूर न नेवो.
आपल्या लाडक्या
लेकीच्या मास्तरांच्या म्हणजे प्रो. बद्रीनाथांच्या खाण्यापिण्याच्या गमती राधा व
तिच्या मैत्रिणी जेव्हा घरी बोलायच्या तेव्हां सुनेत्राताईंना वाईट वाटायचे. कधी
जेवणाच्या वेळी डझनभर पिकलेली केळी खाणे किंवा कधी मक्याची कणसे, बटाटे, रताळी
किंवा डझनभर हिरवी कच्ची केळी आणि कधी अंडीसुध्दा प्रयोगशाळेतील चंचुपात्रांत
उकडुन तिखट मिठाशिवायच हे गुरुजी मिटक्या मारत खातांत हे कळल्यावर मात्र त्यांना
राहावेना.
एक दिवस जेवणाच्या
सुट्टीत त्या प्रो. बद्रीनाथांना भेटायला प्रयोगशाळेंत गेल्या आणि आपल्या
डोळ्यांने त्यांचे जेवणाचे प्रयोग म्हणजे खरे तर हाल पाहीले. प्रो. बद्रीनाथांच्या
सगळ्या अटी मान्य करुन त्यांना हवा तसा, हवा तेव्हडा, हवा तेव्हा डबा आणि तोही
प्रो. बद्रीनाथ म्हणतील त्या किमतींत देण्याचे मान्य केले. नादीष्ट प्रो.
बद्रीनाथांना चांगलेचुंगले जेवण म्हणजे काय हे खरे तर ठावूकच नव्हते.
सुनेत्राताईंच्या घरचा चौरस डबा व रात्री घरीच जेवायला गेल्यावर पाटावर बसून पुढे
ठेवलेल्या चौरंगावरच्या मोठ्या ताटातील षड्रसयुक्त साग्रसंगीत अन्नकोट. मग काळाच्या
ओघांत प्रो. बद्रीनाथ आपल्या खाण्याच्या अटीच विसरुन गेले नसतील तरच नवल. पुढे ते
सुनेत्राताईंना म्हणू लागले की तुम्हाला हवा तसा तुम्ही रोज कराल तोच डबा देत जा.
मला हे सगळेच आवडते. हे ऐकल्यावर कोणत्याही मातेचा ऊर भरुनच येणार. तर काय आपले
नायक प्रो. बद्रीनाथ सुग्रणीच्या हातचे अन्न खायला नादावले आणि थोडे माणसांत येवू
लागले. अनंतरावांना हा बुध्दीमान तरुण आपल्या घरांत वावरतो त्यामुळे परगांवी असले
तरी घराची चिंता कमी झाली. कधी घरी असताना रात्री उशिरापर्यंत या दोघांच्या गप्पा
चालायच्या आणि त्यातून घरांत राधाबाई आणि सुनेत्राताईंनाही काव्य, शास्त्र,
विनोदासह विज्ञानाचीही खोली समजायची. दिवस आनंदात चालले होते. प्रो. बद्रीनाथ
साक्षांत अन्नपूर्णेच्या म्हणजे सुनेत्राताईंच्या हातच्या चविष्ट आणि रोज काहीतरी
नवीन पदार्थ खावून तृप्त होवू लागले आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतांत तो हाच काय असे
त्यांना जणू वाटू लागले. प्रो. बद्रीनाथांच्या स्वर्गात आता उणीव होती ती फक्त
रंभा व मेनकेची, कारण स्वर्गच ना तो. पण वाचकहो स्वर्गांत इंद्राला
व्दिभार्याप्रतिबंधक कायदा लागू नसला तरी प्रो. बद्रीनाथांना जरुर होता. या
पृथ्वीवरच्या लोकशाहींत ऊर्वशी, रंभा, मेनका व सर्वकाही एकीतच काय ते लग्नापूर्वी
बघून घ्यायला हवे. नंतर तक्रार नको. त्यांत सुनेत्राताईंच्या हातच्या सुग्रास
भोजनाचा मोह. इकडे त्याचवेळी सुनेत्राताईंच्या मनांत त्यांच्या स्वप्नांतला जावई
प्रो. बद्रीनाथांच्या रुपांत जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सतत दिसायला लागला. शेवटी
व्हायचे तेच झाले. मागणी सासुबाईंनी घातली का प्रो. बद्रीनाथ विरघळून आपणहूनच
साजूक तुपाच्या रांजणात आकंठ डुबले ते जरा नक्की माहीती नाही. पण प्रो. बद्रीनाथ
चतुर्भुज झाले. सुनेत्राताईंचे व अनंतरावांचे डोक्यावरचे ओझे हलके झाले आणि या
गडबडीत कधीतरी राधाबाईंना सुलक्षणा नावांची गोड मुलगी होवून गेली. असो. आपला विषय
कोणाच्या लग्नाच्या इतिहासाचा नसून वाचकांची उत्कंठा ज्याच्यापाशी अडली आहे त्या
प्रो. बद्रीनाथांच्या आनंदापाशी येवून थांबला आहे. तर आता प्रो. बद्रीनाथांना कसला
इतका आनंद झाला ते पाहू.
त्याचे असे झाले. निसर्गप्रेमी बद्रीनाथांनी
फार पूर्वी मित्राच्या नादाने मध्य रेल्वेच्या बोर घाटातील खंडाळा रेल्वे
स्टेशनजवळच्या तलावानजिक गावठाणांत दोन गुंठे जागा विकत घेतली होती. नोकरी
व्यवसायातून वेळ मिळाल्यावर टुमदार कौलारु चार खोल्यांची एकमजली बंगली बांधली होती
आणि आठवड्याची अखेर ते तेथे घालवण्यासाठी आग्रही असत. मुलीच्या मैत्रीणी, घरचे
नातेवाईक यांनाही शहरापासून दूर विरंगुळ्याची सोय झाली. सुनेत्राताईंना
स्वयंपाकाचा कधी कंटाळा नव्हतांच. घाटांतला रानमेवा खाणे हा सुट्टीतला मुलांचा
आनंदाचा ठेवा होता. हे सर्व पाहूनच प्रो. बद्रीनाथ आनंदून जायचे.
कमलेश हा शेजारच्या
आमराईतील जुन्या शंकराच्या मंदीराच्या पुजा-याचा पितृछत्र हरवलेला व त्या पुजा-यांच्या
भाषेत काहीसा उनाड भाचा. कमलेशला प्रो. बद्रीनाथ भावले तर प्रो. बद्रीनाथांना
कमलेशच्या रुपांत मिळाला एक तरुण, उत्साही त्यांच्या सारखांच धडपड्या सहकारी. आणि
त्यांतच ती घटना घडली.
कमलेशच्या मामीला
म्हणजे पुजा-यांच्या पत्नीला हात पाय गार पडण्याचा आजार होता. त्यांत खंडाळ्याचा
धो धो पाऊस. सुरु झाला की आठवडा, पंधरवडा सतत पडायचा. त्याला उसंत अशी नाहीच. त्यांत
विजेचा लपंडाव, व्होल्टेज कमी, शंभर वॉटचा दिवा लावला तर पंधरा वॉटचा उजेड पडायचा.
पांढ-या दुधी प्रकाशाची नळीच्या आकाराची विजेची ट्यूब कमी दाबामुळे सुरुच व्हायची
नाही. वातावरणांत दमटपणा आणि घरांत कुबटपणा भरलेला. पावसाळ्यांत कपडे कोरडे वाळायचेच
नाहीत. त्यावर हिरव्या रंगाची बुरशी यायची. माणसाच्या व प्राण्यांच्या पण अंगावर
बुरशी येत असणार. दिसायची नाही इतकीच.
तर अशाच एका
पावसाळ्या अंधा-या रात्री कमलेशच्या मामीला खूप थंडी भरुन आली. नाडी लागेना. डोळे
उघडेना. मग मामांनी कमलेशला सरकारी डॉक्टरांना आणण्यासाठी पिटाळले. डॉक्टर जागेवर
नाहीत म्हटल्यावर कमलेश बद्रीनाथांची दुचाकी घेवून घाटातल्या नागनाथाच्या गुहेत नेहमी
राहणा-या आणि कधीमधी खंडाळ्याच्या भजी पॉइंटच्या मागे राजमाचीच्या रस्त्यावरच्या
जुन्या देवळांत राहणा-या साधूकडे गेला. जाणकार साधूने तळहातावर मावेल एवढी सहाण
काढून स्वच्छ धुतली. भगव्या झोळीतून एक चमचमणारे सोनेरी कण दिसणारी भुरकट रंगाची
असणारी सोंगटी काढली. सहाणेवर पाच दहा थेंब पाणी टाकून त्यावर सोंगटीचे वळसे ओढले.
त्याचे इतुकेसे गंध कमलेशच्या हातातल्या
चांदीच्या डबीत घातले आणि ते गंध आले तुळशीच्या रसांत घालुन जिभेवर किंवा जिभेखाली
घासून जिरव असे सांगितले. कमलेश घरी येईपर्यंत मामांनी आले तुळशीचा रस काढूनच
ठेवलेला पाहून कमलेशलाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहीले नाही. गडबडीत प्रश्न न
विचारता त्याने डबीमध्ये तो रस कालवला आणि मिश्रण जिभेवर चाटवले. या वेळेपर्यंत
मामीच्या पापण्या अर्धवट बंद , बुबुळे वर चढलेली व थंडपणे निर्जीव दिसणारी, हातपाय
गार पडलेले, मनगटाची नाडी लागते न लागते अशी गप्प, छाती श्वासाबरोबर हलत होती की
नाही ते कळेना. कमलेशला तर वाटले मामी गेली. पण मामा कर्मठ असूनही एक ही शब्द न
बोलता प्रो. बद्रीनाथांनी आग्रह केल्यामुळे मामींच्या हातापायाला ब्रॅंडी चोळत
बसलेले. त्यांनी आयुष्यांत कधी दारुला स्पर्श केला नव्हतां. पण प्रो. बद्रीनाथांचा
सल्ला मानून पत्नीच्या जीवापेक्षा आपला अहंकार व तात्विक बाणा अंमळ दूर ठेवला
होता.
आणि इकडे काय
आश्चर्य तीन- चार वेळा चाटण दिल्यावर मामींचे हातपाय कोमट झाले. किंचित
कण्हल्यासारखे करुन मग डोळे उघडुन आवंढा गिळला. घोटभर गवती चहा आल्याचा चहा चालेल
का असे राधाबाईंनी विचारल्यावर किंचित हसून मान हलवली. चहा घेतल्यावर स्वेटर घातला
आणि मामींनी सर्वांशी दोन शब्द बोलल्यावर सगळ्यांना हायसे वाटले. श्रध्दाळू मामा
बद्रीनाथांना म्हणाले फकीराने अपमृत्यू टाळला. आजची वेळ खडतरच होती पण दुपारपासून
महामृत्युंजयाचा संकल्पपूर्वक जप आणि अभिषेक केला त्याचे तीर्थ मामीला प्राशन
करवले त्याचा ही उपयोग झाला असणार.
प्रो. बद्रीनाथ
शास्त्रीय बुध्दीने विचार करत राहीले. चमत्कार तर झाला होताच. थंड पडलेले अंग केवळ
ब्रॅंडी चोळून गरम झाले नाही हे तर नक्की. मग अॅड्रिनलीन, नॉर अॅड्रिनलीन,
डोपामाईन, हायड्रो कॉर्टिझॉन, डेक्झा मिथॅझॉन इ. जीव रक्षक औषधांचे उपयोग तेही
सूचिकाभरण म्हणजे इंजेक्शनच्या रुपाने जसे पाहायला मिळतांत तसा प्रभाव
खेडेगावातल्या फकीराच्या कणभर चाटणाच्या उपयोगाने घडतो यातही काहीतरी शास्त्र
असलेच पाहीजे. झाले. प्रो. बद्रीनाथांना हा विचार काही चैन पडू देईना. त्यांची
झोपच उडाली जणू. मामांशी झालेल्या चर्चेत आणखी माहिती पुढे आली. या सध्याच्या
मध्यमवयीन साधूचे गुरुही दीर्घकाळापासून अशाच फकीरी मात्रांचा उपयोग वर्षानुवर्षे
करत आहेत. त्यांनीही अशा अनेक लोकांना मरताना किंवा जणू मेल्यावरही उठवले अशी
वदंता गावांत होतीच. मृत्यूपत्रावर सहीसाठी स्वर्गवासी झालेल्या कोणा म्हाता-या
माणसाला एक तास जिवंत केल्याचे समजले. घरातले गुप्त धन, घराण्याचा परंपरागत मंत्र
मुलाला सांगावा यासाठी ऊर्ध्व लागलेल्या माणसाला पाच दहा मिनिटे बोलते करायला
मात्रा उपयोगी पडल्याचे कळले. मामींसारख्या काही प्रकरणांत तर त्या वाईट काळातला
अपमृत्यू टाळल्यावर मग कितीही वर्षे जगण्याची अडचण राहीली नव्हती. गरीबाचे वाली ठरणा-या
आणि कर्त्या पुरुष किंवा बाईचा प्राण वाचवून घरच जगवण्याचे पुण्य त्या फकीरांना
मिळायचे. मामींची नाडी लागत नव्हती. हातपाय गार झालेले प्रो. बद्रीनाथांनी स्वत:च पाहीले अनुभवले
होते. मामांच्या घरातल्या आधीच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या मृत्यूपूर्वी चाटण
आणवून खरा मृत्यू आहे का अपमृत्यू याचाही सोक्षमोक्ष लावला गेला होता. उपयोग न
होता दगावलेल्या माणसाबद्दल फकीराचे म्हणणे त्याची वेळ भरली इतकेच होते.
जगलेल्याच्या बाबतीत पण खोटा मोठेपणाचा आव नसायचा. जायची वेळ आली नाही म्हणून उठला.
हजार वर्षांची जुनी जड सोंगटी हा गुरु कृपेचा प्रसाद मानला जायचा. माणसाची
ईश्वरावरची श्रध्दा वाढावी आणि न मागता आपला संन्यासी पध्दतीने जगण्याचा मार्ग
सोपा व्हावा इतकीच फकीराची अपेक्षा होती. उगाचच नागनाथाच्या गुहेतल्या फकीराला
आठवड्याचा शिधा पाठवण्यासाठी तालमीतली पोरे पाठवली जात नव्हती. गावांत कधीमधी साप
किरडू चावले, ताप चढला, बाळाचे रडणे थांबत नसेल, बाई अडली की फकीराची आठवण व्हायची
आणि तो हमखास उपयोगी पडायचाच.
अर्थात कोणाच्या
केवळ सांगण्यावर विश्वास ठेवून ऐकणा-यांपैकी प्रो. बद्रीनाथ नव्हतेंच. फकीराशी
चर्चा करुन फार काही हाती लागले नाही. मग त्यांनी कमलेशकडून चाटणाची डबी मिळवली.
ती मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनात कार्यरत आपल्या विद्यार्थ्याच्या प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठवली. पुण्या मुंबईमधील परंपरागत वैद्यकी व स्वत: ची औषधे
पिढ्यानुपिढ्या करणा-या वैद्य नानल, वैद्यपंचानन कवडेशास्त्री, बृहतत्रयीरत्न
दातारशास्त्री, सरदेशमुख महाराज इ. शी शास्त्रचर्चा केली. प्रो. बद्रीनाथांचा
शास्त्राभ्यास, शुध्द हेतू व संशोधनाची तळमळ पाहून सर्वांनीच मदत करण्याची तयारी
दर्शवली. रासायनीक परीक्षणाचा अहवाल हाती आल्यावर, प्रो. बद्रीनाथांनी आपला मोर्चा
आधी मेडिकल कॉलेजकडे व नंतर मुंबई व्हेटरनरी कॉलेज कडे वळवला. पांढरे उंदीर, गिनी
पिग व सशावर प्रायोगिक स्तरावर औषधाचा आश्चर्यजनक परिणाम घडतो हे तेथील
प्राध्यापकांनी मान्य केले. नाडीची गती, शरीराची उष्णता, रक्तदाब, ह्रदयाची शक्ती,
उत्साह वाढतो हे कुत्र्यावरच्या प्रयोगांत दिसलेच पण दम लागलेल्या, दुर्बल
ह्रदयाच्या रुग्णांवरही पुण्याच्या ताराचंद रामनाथ रुग्णालयांत प्रयोग करुन खात्री
पटवली.
आधी अॅटॉमिक अॅप्सॉर्प्शन
स्पेक्ट्रोफोटोमिटर वर जड सोंगटीचे इलेमेंटल अॅनॅलिसिस केल्यावर त्यांत शुध्द
सोने, पारा व गंधक असे तीन पदार्थ आढळले. पुण्या,मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये
आधुनिक वैद्यकातील फार्माकॉलॉजी शिकवणा-या प्राध्यापकांनी या औषधाबद्दल माहिती
नसल्याचे सांगून माफी मागितली. त्यांत त्यांची काही चूक नव्हती. इंग्रजी औषधांच्या
पुस्तकांत सोने पारा गंधकाच्या औषधांबद्दल उल्लेखही नव्हतांच. पण परंपरेने
आयुर्वेद वैद्यकी करणा-या वैद्यपंचाननांनी ग्रंथ संदर्भ दाखवले. रसरत्नाकर,
रसेंद्रसारसंग्रह, रसचंडांशू, रसतरंगिणी, रसरत्नसमुच्चय अशा अनेक आर्य ग्रंथांमधील
पाठांचे चर्वित चर्वण झाले आणि तो आजचा दिवस उजाडला. हजारो लाखो वर्षे टिकू
शकणारा, एक्सपायरी नसणारा, महाप्रतापी असा हेमगर्भ रसाचा स्वत: च्या पोटामध्ये
म्हणजे गर्भांत हेम म्हणजे सोने सांभाळणारा हेमगर्भ औषधाचा एक आगळावेगळा प्रयोग
त्यांनी अनुभवला होता. आधुनिक काळांत इंटेन्सिव्ह केअर क्लिनिक- आयसीयू आहेत. पण
त्यामध्ये भरती करण्यापूर्वी किती रक्कम भरायला लागते आणि ती कोठून आणायची हे
सामान्य अडाणी माणसाच्या डोक्याला झेपत नाही. खेड्यापाड्यांत राहणा-या आदीवासी, मजदुर,
शेतकरी माणसाच्या प्राणाला वाचवण्यासाठी हेमगर्भ, सूतशेखर इ. मात्रांचाच उपयोग होत
राहणार.
आता वाचकांनीच
ठरवावे की अशा गुणकारी औषधाचे रहस्य आणि फकीरी मात्रेचे शास्त्रीय गुपीत उघडकीस
आल्यानंतर प्रो. बद्रीनाथांचा आनंद गगनांत मावेनासा होईल का नाही.
डॉ. मंदार
अक्कलकोटकर
असोसिएट प्रोफेसर
(प्रपाठक), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे
ayurvedscienceforum@gmail.com; 9822777161